डोंबिवली : ‘मोबाईल जास्त बघू नकोस. अभ्यासाकडे लक्ष दे,’ अशी आई बोलल्याने त्याचा राग येऊन एका १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीने मोठागाव माणकोली पुलावरून खाडीत उडी मारून दहा दिवसापूर्वी आत्महत्या केली. या मुलीचा मृतदेह शनिवारी मोठागाव खाडीत आढळून आला.

अल्पवयीन मुलगी आपल्या आई वडिलांसह डोंबिवली पश्चिमेतील उमेशनगर भागात राहत होती. मुलीचे वडील भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. मुलगी शाळेत शिक्षण घेत होती. मुलीच्या हातात सतत मोबाईल पाहून आईने जास्त मोबाईल बघू नकोस. अभ्यासाकडे लक्ष दे, अशी सूचना मुलीला ५ डिसेंबर रोजी दुपारच्या वेळेत केली. त्याचा राग मुलीला आला.

हेही वाचा…धक्कादायक! ठाणे जिल्ह्यातून बनावट औषधांची रुग्णांना विक्री, आंतरराज्यीय टोळीचा सहभाग असण्याची शक्यता

तिने घरात काही न सांगता ती बाहेर निघून गेली. ती बाहेर मैत्रिणीकडे गेली असावी, असा संशय कुटुंबियांना आला. दुपारच्या वेळेत गेलेली मुलगी संध्याकाळ झाली तरी घरी आली नाही म्हणून कुटुंबियांनी तिची शोधाशोध सुरू केली. ती कोठेही आढळून आली नाही.

हेही वाचा…कल्याणमध्ये पत्रीपूलजवळ जलवाहिनी फुटली, शेकडो लीटर पाण्याची नासाडी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुलगी बेपत्ता झाल्याने मुलीच्या वडिलांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या अनुषंगाने विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार, पोलीस उपनिरीक्षक जी. बी. देवरे यांनी याप्रकरणाचा तातडीने तपास सुरू केला. त्यावेळी पोलिसांना एका मुलीने मोठागाव येथील माणकोली पुलावरून उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी खाडी पात्रात मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. ती आढळून आली नाही.गेल्या शनिवारी मुलीचा मृतदेह मोठागाव खाडी भागात किनारी लागल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. मुलीच्या कुटुंबियांना घटनास्थळी पाचरण केले.मृत मुलगी आपलीच असल्याचे कुटुंबियांनी पोलिसांना सांगितले. वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण करून पोलिसांनी मुलीचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिला. विष्णुनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणाची अकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.