१३ जणांवर गुन्हा दाखल, दोघांना अटक

ठाणे : डोंबिवली येथील निळजे गावातील वाकळण भागात चार वर्षांच्या मुलीसह दाम्पत्याने आत्महत्या केल्याचे सोमवारी सकाळी उघडकीस आले. याप्रकरणी शीळ-डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पोलिसांनी दोन नातेवाईकांना अटक केली आहे.

शिवराम रामा पाटील (३९), त्याची पत्नी दीपिका (३३) आणि मुलगी अनुष्का (४) अशी आत्महत्या केलेल्या तिघांची नावे आहेत. डोंबिवली येथील निळजे गावातील वाकलण भागामध्ये शिवराम पाटील हे कुटुंबासह राहत होते. १ मार्च रोजी म्हणजेच रविवारी रात्री शिवराम यांनी कुटुंबासह आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहिली होती.

ही चिठ्ठी दीपिका यांनी त्यांचा भाऊ श्रीनाथ केणे यांना मोबाइलद्वारे पाठविली होती. ती पाहताच केणे यांनी दीपिका यांच्या घरी धाव घेतली मात्र ते घरी पोहचण्यापूर्वीच तिघांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. शिवराम आणि दीपिका या दोघांनी अनुष्काला गळफास देऊन मारले असावे, त्यानंतर त्या दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

त्यांच्या आत्महत्येप्रकरणी मनोहर वसंत पाटील (३९) आणि वैभव चंद्रकांत पाटील (२९) या दोघांना शीळ-डायघर पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शिवराम यांचा घराचे बांधकाम करण्यावरून नातेवाईकांशी वाद सुरू होता.

या घटनेप्रकरणी दीपिका यांचा भाऊ श्रीनाथ केणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून शीळ-डायघर पोलीस ठाण्यात १३ नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपिका यांनी पाठविलेल्या चिठ्ठीमध्ये ‘नातेवाईकांकडून वारंवार होत असलेल्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असून आमची हत्या केल्याचा गुन्हा दाखल करून त्यांना पोलिसांनी अटक करावे. अशी आमची शेवटची इच्छा आहे’, असे म्हटले होते. ही चिठ्ठी आरोपींनी फाडून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केणे यांनी तक्रारीमध्ये केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

नातेवाईकांवर आरोप..

शिवराम यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नातेवाईकांच्या त्रासाला कंटाळून कुटुंबीयांसह आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे. तसेच १३ नातेवाईकांची नावे लिहण्यात आली असून त्यांना आत्महत्येस जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करावी. तसेच जमीन व इतर मालमत्ता दीपिकाच्या भावाला द्यावी. त्याने ही मालमत्ता अनाथ आश्रमामध्ये दान करावी, असे चिठ्ठीत म्हटले आहे.