कल्याण-शिळफाटा रस्त्यावर अनेक ठिकाणी ढाबा, हॉटेल, पेट्रोल पंप चालक, वाहन दुरुस्ती दुकान मालकांनी आपल्या सोयीसाठी रस्ता दुभाजक तोडून किंवा बाजुला करुन ठेवले आहेत. यामुळे वाहन चालक मनमानेल तेव्हा तोडलेल्या दुभाजकांमधून घुसून दोन्ही मार्गिकांच्या मध्ये आडवा घुसून वाहन कोंडीला सुरूवात करतो. एकल मार्गिका वाहन कोंडीने बंद झाली की दुसऱ्या मार्गिकेतील सर्व प्रकारचे वाहन चालक वाहतूक पोलिसांना न जुमानत मार्गिकेचे उल्लंघन करुन वाहने चालवितात. हे शिळफाटा रस्त्यावरील वाहतूक कोंडीचे सर्वात महत्वाचे कारण आहे, अशी माहिती या रस्त्यावरुन नियमित येजा करणाऱ्या प्रवाशांनी दिली.

दुभाजक करण्याचे साचे –

शिळफाटा रस्त्याच्या मध्यभागी रस्ता दुभाजक तयार करण्याचे काम काटई परिसरातील वैभवनगरी भागात सुरू आहे. यापूर्वी तयार रस्ता दुभाजक रात्रीच्या वेळेत आणून बसवून दिवसा हे दुभाजक रस्त्याच्या मध्यभागी जोडून ते काँक्रीटने जोडण्याचे काम कामगार करत होते. आता हे रस्ता दुभाजक तयार करण्याचे काम रस्त्याच्या मध्यभागी साच्याच्या माध्यमातून केले जाते. रस्ता दुभाजक तयार करताना सिमेंट व इतर मिश्रण, यंत्रसामुग्री रस्त्याच्या मध्यभागी ठेवली जाते. अनेक वेळा दुभाजक उचल ठेव करण्यासाठी रस्त्या मध्येच जेसीबी आणून उभा केला जातो. अचानक काम सुरू असलेल्या ठिकाणी कामगार, यंत्रसामुग्री आली की त्या ठिकाणी वाहतूक कोंडीला सुरूवात होते. कामगार वाहतूक कोंडीपेक्षा त्याच्या कामाला महत्व देत असल्याने तो कोंडीकडे लक्ष देत नाही. अशी कामे सुरू असताना तेथे वाहतूक पोलीस नसल्याने त्या भागात वाहन कोंडीला सुरूवात होते. मग वाहन चालक तोडलेला रस्ता दुभाजक, दुभाजक तयार करण्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणातून उलट मार्गिकेत घुसून इच्छित स्थळी प्रवासाला सुरूवात करतो. अशावेळी समोरुन येणाऱी वाहने सुसाट असल्याने उलट मार्गिकेतून जाणाऱ्या वाहन चालकाल ती धडकण्याची दाट शक्यता असते. उलट मार्गिकेतून यापूर्वी दुचाकी स्वार प्रवास करत होते. आता कोंडीतून मुक्त होण्यासाठी अवजड ट्रक, टेम्पो, मोटार चालक पण घुसतात. जागोजागी वाहतूक पोलीस तैनात करणे वाहतूक विभागाला शक्य नसल्याने त्याचा गैरफायदा चालक घेत आहेत, असे प्रवाशांनी सांगितले.

navi mumbai, hawkers, navi mumbai municipal corporation
नवी मुंबईत रस्त्यावरही फेरीवाल्यांचे बस्तान, महापालिका कारवाईबाबत उदासीन; नागरिकांना फेरीवाल्यांची दमदाटी
Difficulties in the redevelopment of redeveloped buildings
मुंबई : पुनर्विकसित इमारतींच्या पुनर्विकासात अडचणी!
uran, irresponsible, heavy vehicle parking, cause accident, jnpt palaspe national highway, marathi news,
उरणमध्ये बेदरकार अवजड वाहनांची दहशत कायम
navi mumbai, Valve Repair, Traffic Congestion, footpath close, Pedestrian Woes, kopar khairane, teen taki area, marathi news,
व्हॉल्व दुरुस्तीच्या कामामुळे पादचाऱ्यांचे हाल; कोपरखैरणेत तीन टाकी परिसरात पदपथ बंद

व्यापाऱ्यांची मक्तेदारी –

शिळफाटा रस्त्याच्या दुतर्फा पेट्रोल पंप, ढाबे, वाहन दुरुस्तीची दुकाने आहेत. आपल्या पेट्रोल पंपावर वाहन चालकाने यावे यासाठी बहुतांशी पेट्रोल पंप चालकांनी पंपा समोरील रस्ता दुभाजक फोडून ठेवले आहेत. जेणेकरुन उलट बाजुने जाणारा वाहन चालक आपल्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी येईल. आणि पंपावरुन पेट्रोल भरुन बाहेर जाणाऱ्या चालकाला झटपट रस्ता ओलांडून इच्छिक मार्गिकेत जाता यावे यासाठी पंप चालकांनी अनेक ठिकाणी रस्ता दुभाजक फोडून ठेवले आहेत. या फोडलेल्या दुभाजकांमधून अनेक वाहन चालक वाहन कोंडी झाली की मध्ये घुसून वाहतूक कोंडी करतात. अशाच पध्दतीने शिळफाटा, काटई-बदलापूर रस्त्या लगत दुतर्फा अनेक ढाबे, हाॅटेल्स आहेत. या हाॅटेल, ढाबे चालकांनी वाहन चालक विना अडथळा आपल्या हाॅटेल, ढाब्यामध्ये यावा म्हणून या मालकांनी रस्ता दुभाजक फोडून ठेवले आहेत. अशा पध्दतीने दुभाजक फोडणाऱ्यांवर एमएसआरडीसी कोणतीही कारवाई करत नसल्याने त्याचा गैरफायदा व्यावसायिक घेत आहेत. एखाद्या वाहन चालकाला वळसा घ्यायचा असेल तर तो पुढे जाऊन वळसा न घेता जागीच वळण घेऊन फोडलेल्या दुभाजकाच्या मधून इच्छित स्थळी जातो. हे वळण घेत असताना वाहन चालक मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी करतो, असे स्थानिकांनी सांगितले.

रस्तारेषा मातीत –

शिळफाटा रस्त्याच्या दोन्ही बाजुला पाच-पाच फुटाच्या रस्ता रेषा आहेत. या रस्ता रेषांच्या काही ठिकाणी भूसंपादन झालेले नाही. काही ठिकाणी महावितरणची रोहित्रे, विजेचे खांब आहेत. त्या ठिकाणी रस्ता रुंदीकरण करताना ठेकेदाराने काँक्रीटीकरणाचे काम केले नाही. यामुळे हे भाग दगड, मातीचे राहिले आहेत. या कच्च्या रस्त्यावरुन अनेक वाहने कोंडीच्या वेळी मार्ग काढून पुढे जातात. रस्त्याचे असे दोन्ही भाग ठेकेदाराने काँक्रीटीकरण केले असते तरी वाहन चालकांना दोन्ही बाजुने रस्ता उपलब्ध झाला असता. त्याच्या ही विचार ठेकेदाराने केलेला नाही. हे किरकोळ पण महत्वाचे विषय एमएसआरडीसीकडून दुर्लक्षित केले जात असल्याने त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे, असे या भागातील रहिवासी नरेश पाटील, गजानन पाटील यांनी सांगितले.