डोंबिवली – डोंबिवली पश्चिमेत बेकायदा चाळी, इमारतींची बेकायदा बांधकामे अधिक प्रमाणात सुरू आहेत. या बेकायदा बांधकामांसह इतर इमारतींमधील घर विक्री, खरेदीच्या माध्यमांतून नागरिकांची अधिक प्रमाणात फसवणूक केली जात आहे. डोंबिवली पश्चिमेतील चिंचोड्याचा पाडा भागातील रागाई मंदिराजवळील एका इमारतीत घर विक्रीच्या माध्यमातून एका महिलेने घर खरेदीदार महिलेची चार लाख रूपयांची फसवणूक केली आहे.
या घर खरेदी प्रकरणी रोशनी राकेश पवार यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. रोशनी पवार या डोंबिवली पश्चिमेतील गरीबाचापाडा येथील तिरूपती सोसायटीत राहतात. रोशनी पवार यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी रूपाली शैलेश कांबळे यांच्या विरूध्द भारतीय दंड विधान संहितेप्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. डिसेंबर २०२३ ते मे २०२४ या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे.
पोलीस ठाण्यातील माहितीनुसार गुन्हा दाखल रूपाली शैलेश कांबळे या चिंचोड्याचा पाडा येथील रागाई मंदिरजवळील परशुराम हाईट्स या इमारतीमधील एका सदनिकेत राहतात. तक्रारदार रोशनी पवार यांना घर खरेदी करायचे होते. त्यामुळे मिळालेल्या माहितीप्रमाणे रोशनी यांनी रूपाली कांबळे यांच्या घराची पाहणी केली होती. ते घर मनासारखे असल्याने ते घर खरेदीची तयारी दर्शवली होती. रूपाली यांनाही आपली सदनिका विकायची होती. रोशनी यांनी रूपाली कांबळे यांच्याकडून १४ लाख रूपयांना घर खरेदी करण्याची तयारी दर्शवली.
रूपाली कांबळे यांनी १४ लाख रूपये घर खरेदीचे करारपत्र तयार करून ते घर खरेदीदार रोशनी पवार यांना दिले. रोशनी यांनी चार लाख रूपये तातडीने द्यायचे ठरले. रोशनी यांनी धनादेशाच्या माध्यमातून चार लाख रूपयांची रक्कम रूपाली कांबळे यांच्याकडे भरणा केली. उर्वरित १० लाखाची घराची रक्कम सात वर्षात १२ हजार रूपये महिन्याने देण्याचे ठरले होते.
हा लेखी व्यवहार पूर्ण झाल्यानंतर रोशनी पवार यांनी घराचा ताबा मिळण्यासाठी रूपाली कांबळे यांच्यामागे तगादा लावला. किरकोळ कारणे देऊन त्या टाळाटाळ करू लागल्या. त्यानंतर रोशनी पवार यांना कोणतीही चाहूल लागू न देता रूपाली यांनी रोशनी यांना विक्री केलेले घर सुनील गुरव या नागरिकाला वाढीव ठेव रक्कम घेऊन राहण्यास दिले.
रोशनी यांना ही माहिती मिळताच त्यांनी रूपाली कांबळे यांना विचारणा केली. त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. आपणास घर विक्री करायची नसेल तर आपले पैसे परत करा, असा तगादा रोशनी पवार यांनी रूपाली शैलेश कांबळे यांच्यामागे लावला. पण गेल्या वर्षभराच्या कालावधीत घर नाहीच, पण घरासाठी रूपाली यांच्याकडे भरणा केलेले चार लाख रूपयही परत मिळत नसल्याने रूपाली यांनी आपली फसवणूक केली म्हणून रोशनी यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
