डोंबिवली : डोंबिवली शहर परिसरात बेशिस्तीने प्रवासी वाहतूक करणाऱ्या साडे चार हजाराहून अधिक रिक्षा चालकांवर गेल्या सहा महिन्याच्या कालावधीत दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती डोंबिवली वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पाटील यांनी दिली.
डोंबिवली शहर परिसरात सुमारे सात हजाराहून अधिक रिक्षा चालक प्रवासी वाहतूक करतात. डोंबिवली शहर शिळफाटा, २७ गाव, एमआयडीसी परिसरात विस्तारले आहे. या नागरीकरण झालेल्या भागात जाण्यासाठी एसटी, केडीएमटीची बस सुविधा पुरेशी नाही. त्यामुळे प्रवाशांना रिक्षा वाहतुकीवर अवलंबून राहावे लागते.
अनेक रिक्षा चालक अधिकचे पैसे कमविण्याच्या उद्देशाने रिक्षाच्या मागील आसनावर तीन आणि आपल्या चालक आसनावर जवळ एक प्रवासी घेऊन प्रवासी वाहतूक करतात. रिक्षा वाहतुकीत तीन प्रवाशांना प्रवासासाठी मुभा आहे. बहुतांशी रिक्षा चालक आपल्या चालक आसनाजवळ एक प्रवासी घेऊन प्रवास करतात. एकूण चार प्रवासी घेऊन वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांवर गेल्या सहा महिन्याच्या कालावधीत डोंंबिवली वाहतूक विभागाच्या वाहतूक पोलीस, अधिकाऱ्यांनी डोंंबिवलीतील फडके चौक, मानपाडा रस्ता, टिळक रस्ता, शेलार नाका, आयरे रस्ता, पश्चिमेत रेल्वे स्थानक परिसरात गस्त घालून दंडात्मक कारवाई केली आहे.
या कारवाईच्यावेळी अनेक रिक्षा चालक गणवेशात नसल्याचे आढळले. काही रिक्षा चालकांकडे परवाना, नामपट्टी नव्हती. काही रिक्षांचे आयुर्मान संंपल्याचे तपासणीत निदर्शनास आले. या सर्व रिक्षा चालकांवर मोटार वाहन कायद्याने ई चलन पध्दतीने दंडात्मक कारवाई करण्यात आली, अशी माहिती वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पाटील यांनी दिली. रिक्षेत चालकाच्या बाजुला प्रवासी घेऊन वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांना सर्वाधिक लक्ष्य करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
बेकायदा वाहनतळ
डोंबिवली, ठाकुर्ली शहराच्या विविध भागात वर्दळीच्या रस्त्यांवर रिक्षा चालकांनी मनमानी पध्दतीने रिक्षा वाहनतळ सुरू केले आहेत. हे रिक्षा वाहनतळ हटविण्यासाठी पालिका आणि वाहतूक विभागाने पुढाकार घेण्याची मागणी नागरिक करत आहेत. डोंबिवली वर्दळीच्या फडके रस्त्यावर अंबिका हाॅटेलसमोर रिक्षा वाहनतळ सुरू केल्याने फडके रस्ता दररोज वाहतूक कोंडीत अडकतो. फडके रस्त्यावरून विरा शाळेकडे वाहन चालकाला जायचे असेल तर त्याला या बेकायदा रिक्षा वाहनतळामुळे खोळंबून राहावे लागते.
ठाकुर्लीत हनुमान मंदिर ते म्हसोबा चौक दरम्यान सर्वोदय हिमालय सोसायटीसमोर मुख्य वर्दळीच्या एका स्वीट मार्ट दुकानासमोर रिक्षा चालकांनी महिनाभरापासून वाहनतळ सुरू केला आहे. या वाहनतळामुळे ठाकुर्लीतील रस्ता कोंडीत अडकत आहे. हे रिक्षा चालक स्थानिक असल्याने कोंडी झाली तरी ते आपली रिक्षा बाजुला करण्यास पुढाकार घेत नाहीत, अशा तक्रारी आहेत. या रिक्षा चालकांवर वाहतूक विभागाने कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
मागील सहा महिन्याच्या कालावधीत डोंबिवली वाहतूक विभागाने तीन आसनांहून अधिक प्रवासी घेऊन प्रवासी वाहतूक करणाऱ्या साडे चार हजार रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. ही कारवाई यापुढे सुरूच ठेवण्यात आली आहे. – श्रीराम पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, डोंबिवली वाहतूक विभाग.