डोंबिवली – डोंबिवली एमआयडीसीतील मिलापनगर परिसरात एमआयडीसीच्या जलवाहिनीवरून गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने रहिवासी त्रस्त झाले आहेत. पालिका हद्दीत डेंग्यु, मलेरिया, टॉयफॉईड आणि इतर साथ आजारांनी डोके वर काढले असतानाच, घरात एमआयडीसीकडून गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने हा पुरवठा तातडीने बंद होईल यादृष्टीने एमआयडीसी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे.
एमआयडीसीतील मिलापनगर भागातील रहिवाशांच्या घरात शुक्रवारी अचानक गढूळ पाण्याचा पुरवठा सुरू झाला. सुरूवातीला दूषित पाण्याचा पुरवठा आपल्याच घरात होत आहे असे नागरिकांना वाटले. यामुळे रहिवाशांनी जलवाहिन्यांची तपासणी केली. त्यांना जलवाहिन्या कोठेही फुटल्या नसल्याचे आणि त्यात दूषित पाणी जात नसल्याचे निदर्शनास आले.
प्रत्येक घरात गढूळ पाण्याचा पुरवठा झाल्याने मिलापनगर भागातील रहिवाशांनी समाज माध्यमांवर आपली नाराजी व्यक्त करण्यात सुरूवात केली. त्यावेळी एमआयडीसीच्या मिलापनगर परिसराला एमआयडीसीकडून गढूळ पाण्याचा पुरवठा झाल्याचे रहिवाशांच्या निदर्शनास आले. जागरूक रहिवाशांनी ही माहिती तात्काळ एमआयडीसीच्या डोंबिवलीतील अधिकाऱ्यांना दिली. एमआयडीसीतील अनेक घरांमध्ये एमआयडीसीकडून पाणी पुरवठा करण्यात येतो. काही बंगलेधारकांनी जलसाठा करण्याची व्यवस्था केली नाही. त्यामुळे त्यांच्या घरात थेट पाणी येते. त्यांना या दूषित पाण्याचा सर्वाधिक त्रास झाला. ज्या इमारती, बंगल्यांवर पणी साठवण टाक्या आहेत. त्या टाक्यांमध्ये दूषित पाणी आले.
एमआयडीसी अधिकाऱ्यांनी या तक्रारीची दखल घेतली आहे. एमआयडीसी हद्दीत सतत नवीन काँक्रीट रस्त्यांचे खोदकाम, सेवा वाहिन्या टाकण्यात ठेकेदाराकडून एमआयडीसीच्या भूमिगत जलवाहिन्या फोडल्या जातात. हादरा बसलेल्या जलवाहिन्यांमध्ये हळूहळू पावसाचे, बाजुच्या गटाराचे पाणी घुसून ते पाणी नागरिकांच्या घरात येते, अशी माहिती एमआयडीसीतील काही स्थानिकांनी दिली. साथ आजारांनी शहरात डोके वर काढले असताना त्यात दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने रहिवाशांनी बाजारातून पाणी विकत आणून त्याचा स्वयंपाक आणि पिण्यासाठी वापर सुरू केला आहे.
मिलापनगरमधील रहिवासी वसंत छेडा आणि परिसरातील काही रहिवाशांच्या घरात पहिले दूषित पाण्याचा पुरवठा सुरू झाला. त्यानंतर हा प्रकार उघडकीला आला आहे. एमआयडीसीत नवीन काँक्रीट रस्ते झाल्याने रहिवाशांनी समाधान व्यक्त केले होते. पण हे रस्ते आता पुन्हा फोडून तेथे नव्याने रस्ता तयार करण्याची कामे सुरू करण्यात आली आहेत. ही कामे करताना ठेकेदाराचे जेसीबी चालक अनेकवेळा निष्काळजीपणा करत असल्याने भूमिगत जलवाहिन्या, सेवा वाहिन्या तुटत असल्याचे रहिवाशांनी सांगितले.
रस्ते तोडफोडीची कामे एका वजनदार लोकप्रतिनिधीचे ठेकेदार करत असल्याने या रस्ते तोडफोडीच्या विषयावर कोणीही अधिकारी, राजकीय नेता उघडपणे बोलण्यास तयार नसल्याचे समजते. परंतु या जलवाहीन्या तुटत असल्याने त्यातून दूषित पाण्याचा पुरवठा नागरिकांना होत आहे.