डोंबिवली – कल्याण डोंबिवली पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागात मागील काही महिन्यांपासून सुरू असलेला गोंधळ संपतानाचे नाव घेताना दिसत नाही. आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार विविध माध्यमातून उघड होत असताना, आता पालिकेच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात गुडघ्याची शस्त्रक्रिया झालेल्या महिला रुग्णाच्या गुडघ्याचे टाके काढण्यासाठी रुग्णालयात स्टॅपल्स मशिन नसल्याचा प्रकार उघडकीला आला आहे.
या महिलेवर गुडघ्यावरील शस्त्रक्रिया करण्यापूर्वी लागणारे सर्व साहित्य रुग्णाच्या नातेवाईकाला रुग्णालय प्रशासनाने खासगी औषध दुकानातून आणण्यास सांगितले. सुमारे साडे पाच हजार रूपयांचे शस्त्रक्रियेपूर्वीचे साहित्य आणून दिल्यावर मग आपल्या पत्नीच्या गुडघ्याची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे, असे रुग्णाच्या नातेवाईकाने दिली. शस्त्रक्रिया केल्यानंतर डाॅक्टर नियमित रुग्णाकडे फिरकले नसल्याची तक्रार रुग्ण नातेवाईकाने केली.
मिळालेली माहिती अशी की, डोंबिवली पश्चिमेतील महाराष्ट्रनगर भागात धर्मा पाटील चाळीत नीलेश वायंगणकर (३१) हे रिक्षा चालक कुटुंबीयांसह राहतात. घरातील स्वच्छतागृहात नीलेश यांची पत्नी स्वाती वायंगणकर या पाय घसरून पडल्या. त्यांच्या गुडघ्याच्या वाटीला गंभीर दुखापत झाली. खासगी रुग्णालयातील खर्च परवडणारा नसल्याने नीलेश यांनी पत्नी स्वातीला पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याठिकाणी अस्थिरोग तज्ज्ञ डाॅ. कारंडे यांनी त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रिया करण्यापूर्वी लागणारे आवश्यक सर्व प्रकारचे साहित्य आपणास बाहेरून (खासगी औषध दुकान) आणण्यास सांगण्यात आले, असे ते म्हणाले.
दोन आठवड्यापूर्वी शस्त्रक्रिया झाली असल्याने आपण शस्त्रक्रियेचे टाके कधी काढणार म्हणून डाॅक्टरांकडे विचारणा केली. त्यांनी एक चिठ्ठी दिली. शास्त्रीनगर रुग्णालयातील ड्रेसिंग कक्षात जाण्यास सांगितले. तेथील कर्मचाऱ्याने पत्नीच्या गुडघ्यावरील शस्त्रक्रिया जागेची पाहणी केली. जखम ओली असल्याचे आणि टाके काढण्यास विभागात स्टॅप्लस यंत्र नसल्याचे कारण दिले. स्टॅप्ल्स नसताना टाके हिसकून काढले तर शस्त्रक्रियेच्या ठिकाणी जखम होण्याची भीती कर्मचाऱ्याने व्यक्त केली.
टाके काढायचे की नाही म्हणून नीलेश वायंगणकर पुन्हा डाॅ. कारंडे यांच्या दालनात गेले. तेथे ते नव्हते. इतर दालनांमध्ये ते आढळले नाहीत. आपण पुन्हा ड्रेसिंग कक्षात येऊन ड्रेसिंग न काढताच पुन्हा पत्नीला दालनात आणले. हे टाके खासगी डाॅक्टरकडून काढू का. यावर कर्मचाऱ्याने चांगला डाॅक्टर असेल तर काढण्यास हरकत नाही असा सल्ला दिला. शस्त्रक्रिया झाल्यानंतर संबंधित डाॅक्टर रुग्णाची तपासणी करण्यासाठी नियमित फेरी मारतात, असा प्रकार शास्त्रीनगर रुग्णालयात दिसला नाही, असे नीलेश यांनी सांगितले.
दोन हजार कोटीचा अर्थसंकल्प, आरोग्य प्रचारपत्रक छापणे, औषध खरेदी, बाह्यस्त्रोत नोकर भरती, पालिका कर्मचाऱ्याचा गाळा भाड्याने घेणे असे अनेक प्रकार करून लाखो रूपयांची आरोग्य विभागात उधळण सुरू असताना शास्त्रीनगर रुग्णालयात टाके काढण्यासाठी यंत्र नसल्याने रुग्ण नातेवाईकांनी आश्चर्य व्यक्त केले. आयुक्तांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेण्याची मागणी रुग्ण नातेवाईकांकडून केली जात आहे. शास्त्रीनगर रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. योगेश चौधरी यांनी याप्रकरणाची माहिती घेतो असे सांगितले.