डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेत विविध भागात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या ठेकेदारांकडून सीमेंट काँक्रीट रस्ते, गटारांची कामे सुरू आहेत. ही कामे अतिशय निकृष्ट पध्दतीने, कोणतेही नियोजन न करता केली जात आहेत. या सर्व कामांची शासनाने विशेष चौकशी समिती नेमून चौकशी करावी आणि या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे डोंबिवली जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी केली आहे.
डोंबिवली पश्चिमेत श्रीधर म्हात्रे चौक ते अनमोल नगरी हा सर्वाधिक वर्दळीचा रस्ता मागील दोन वर्षापासून सीमेंट काँक्रीटचा करण्याचे प्रस्तावित आहे. या दोन वर्षाच्या कालावधीत हा रस्ता पूर्ण होणे आवश्यक होते. गेल्या वर्षी दिवाळी सणाच्या काळात या रस्त्याचे गटारांची बांधणी न करता, रस्तारूंदीकरण न करता सीमेंट काँक्रिटीकरणाचे काम ठेकेदाराने सुरू केले होते.
स्थानिक रहिवाशांनी अशा नियोजन नसलेल्या कामाला विरोध केला. या रस्त्याचे पहिले रूंदीकरण, मग, गटारे त्यानंतर काँक्रीट रस्ता करा, अशी मागणी लावून धरली अखेर ठेकेदाराने नागरिकांच्या मागणीप्रमाणे कामे केली. ही कामे ठेकेदार मनमानी पध्दतीने करत आहेत, त्यांच्यावर कोणाचा वचक नाही. हे ठेकेदार एमएमआरडीएने नियुक्त केले असल्याने ते पालिकेच्या बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना दाद देत नाहीत. पालिकेच्या अभियंत्याने या ठेकेदारांना काही सूचना केली तर ते थेट त्यांच्या राजकीय मार्गदर्शकाला संपर्क करून पालिका अधिकाऱ्याची तक्रार करतात, असे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी सांगितले.
डोंबिवली पश्चिमेत काही ठिकाणी गटार बांधणीची कामे सुरू आहे. गटार बांधणी करताना काँक्रीटचा वापर होतो. त्यामुळे गटारातील सांडपाणी रोखून धरणे, गटार सांडपाणी मुक्त करणे आवश्यक असते. ठेकेदार गटारात पाणी असताना गटार बांधणीसाठी मिक्सरमधून आणलेला काँक्रीटचा गिलावा गटारात ओतून काँक्रीटची नासाडी आणि निकृष्ट दर्जाच्या गटारांचे बांधकाम करत आहेत. संध्याकाळी सहा वाजल्यानंतर हे मिक्सर डोंबिवलीत दाखल होतात आणि रात्रीच्या वेळेत घाईत घाईत गटारांची कामे अंधारात उरकून घेतली जात आहेत, असे जिल्हाप्रमुख म्हात्रे यांनी सांगितले.
पश्चिमेतील महाराष्ट्रनगरमध्ये रस्तारूंदीकरण न करताच चिंचोळ्या रस्त्याचे पहिले सीमेंट काँक्रिटीकरण आणि त्यानंतर त्या अरूंद रस्त्यात गटार बांधणीची कामे सुरू आहेत. घसरगुंडी पध्दतीने ठेकेदाराने हा रस्ता तयार केला आहे. रस्त्याचे काँक्रिटीकरण करताना पहिल्या त्या रस्त्याचे विकास आराखड्याप्रमाणे रूंदीकरण आणि त्यानंतर काँक्रीटीकरण करणे गरजेचे आहे, असा नियम आहे. ठेकेदार विकास आराखड्यातील रस्त्याप्रमाणे कामाचे देयक वसूल करणार. काम मात्र अरूंद रस्त्याचे करणार. यामध्ये मोठा घोळ आहे. यासर्व सीमेंट काँक्रीट रस्ते आणि गटार कामांची चौकशी शासनाने सुरू करावी, अशी मागणी म्हात्रे यांनी आहे. महाराष्ट्रनगरमधील रस्ता मनमानी पध्दतीने बांधणीचे काम सुरू आहे. एका राजकीय पक्षाचा ठेकेदार याठिकाणी काँक्रीट रस्ते काम करत असल्याचे समजते.