गेल्या दोन महिन्यांपासून डोंबिवलीतील रहिवासी, प्रवासी खड्ड्यांनी त्रस्त आहेत. हे कमी म्हणून काय डोंबिवली शहराच्या प्रवेशव्दारावर दोन महिन्यांपासून बंद असलेला उपद्रवी वाहतूक दर्शक (सिग्नल) कल्याण डोंबिवली पालिकेच्या स्मार्ट सिटी कंपनीने सुरू केल्याने, अनेक दिवस मोकळा श्वास घेत असलेला घरडा सर्कल चौक पुन्हा वाहतूक कोंडीत अडकू लागला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या वर्षी वाहतुकीचे योग्य नियोजन व्हावे म्हणून सावळाराम महाराज क्रीडासंकुल येथील घरडा सर्कल चौकात स्मार्ट सिटी कंपनीतर्फे वाहतूक विभागाच्या प्रस्तावाप्रमाणे दर्शक बसविण्यात आला. या दर्शकातील वाहने थांबा, सोडण्याच्या १८० सेकंदाच्या असल्याने घरडा सर्कल चौकात अभूतपूर्व वाहन कोंडी होऊ लागली. हा दर्शक (सिग्नल) बंद करा म्हणून प्रवाशांनी स्मार्ट सिटी कंपनीकडे अनेक तक्रारी केल्या. डोंबिवलीतील ज्येष्ठ वास्तुशिल्पकार पी. एस. गोखले यांनी घरडा चौकातील वाहतूक दर्शक, त्यामुळे होणारी कोंडी, प्रवाशांचे हाल याविषयी पालिकेत, वाहतूक विभागाकडे अनेक पत्रे दिली आहेत.

दर्शक सुरू झाल्या पासून घरडा चौकाच्या पेंढरकर महाविद्यालय रस्ता, बंदिश हाॅटेल रस्ता, डोंबिवली जीमखाना, शिवम रुग्णालय रस्ता अशी चार बाजुने कोंडी होत आहे. आजदे बाजुला रस्त्यावर बस थांबे आहेत. चौकात कोपऱ्यावर रिक्षा वाहनतळ आहे. अनेक रिक्षा चालक चौकातील मुख्य रस्त्यावरून रेल्वे स्थानक दिशेने प्रवासी वाहतूक करतात. चौकातील कोंडीतून बाहेर पडलेली वाहने बस थांबा, बेकायदा रिक्षा वाहनतळांजवळ अडकून पडतात. डोंबिवली जीमखाना, सागर्ली, मानपाडा भागातून येणारी वाहने शिवम रुग्णालया जवळ कल्याण दिशेने वळण घेण्यास (दर्शक रांगा) रस्ता नसल्याने अडकून पडतात.

दर्शक बंद

पालिकेने दर्शक वीज पुरवठ्याचे देयक भरणा न केल्याने महावितरणने या दर्शकाचा वीज पुरवठा खंडित केला होता. या दर्शकात काही तांत्रिक अडचणी आल्याने स्मार्ट सिटी कंपनीने दर्शकामधील दुरुस्ती, वेळेचे नियोजन करण्यासाठी दर्शक यंत्रणा मागील दोन महिने बंद ठेवला होती. त्यामुळे घरडा चौकात दर्शकामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीतून प्रवाशांची मुक्तता झाली होती. गेल्या पाच दिवसांपासून घरडा सर्कल मधील दर्शक यंत्रणा पुन्हा सुरू करण्यात आल्याने प्रवासी त्रस्त आहेत.

वाहूतक पोलीस पत्र

कोळसेवाडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांनी पालिका स्मार्ट सिटी कंपनीला पत्र देऊन घरडा चौकातील दर्शक चिन्हांकित (बाण) न ठेवता झळकत्या (फ्लॅश-वाहने सतत धावतील) स्थितीत ठेवण्याची मागणी केली आहे. घरडा सर्कलमध्ये वाहनांची सर्वाधिक येजा आहे. चौकातील वाहतूक बेट कमी करणे, बाजुचा बस थांबा, बेकायदा रिक्षा हटविणे, रस्ते पट्ट्या सुस्थितीत करून मग दर्शक यंत्रणा सुरू करणे आवश्यक आहे. तसे न करता दर्शक सुरू केल्याने चौक कोंडींच्या विळख्यात अडकत आहे, अशी माहिती वास्तुशिल्पकार पी. एस. गोखले यांनी दिली. शहर अभियंता विभागाला वाहतूक विभागाने वाहतूक बेट कमी करण्यासाठी चार पत्रे दिली. त्याची दखल शहर अभियंता सपना कोळी यांनी घेतली नाही.

वाहतूक विभागाचे सूचनेप्रमाणे घरडा चौकात दर्शक बसविण्यात आला. कोंडी होत असल्याच्या तक्रारी आल्याने वाहतूक विभागाच्या सूचनेवरून दर्शक झळकत्या स्थितीत ठेवण्यात आला आहे. – प्रशांत भगत , महाव्यवस्थापक ,स्मार्ट सिटी कंपनी, कल्याण

दर्शक सुरू झाल्या पासून प्रवाशांनी खूप तक्रारी केल्या. त्यामुळे घरडा चौकातील दर्शक झळकत्या स्थितीत ठेवण्याची मागणी पालिकेकडे केली आहे. – रवींद्र क्षीरसागर ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक ,कोळसेवाडी, वाहतूक विभाग

घरडा चौकातील वाहतूक बेट कमी करून रस्ते पट्टी, रिक्षा वाहनतळ सुविधा देऊन दर्शक सुरू करणे आवश्यक आहे. वेळेचे सुसुत्रीकरण नसल्याने चौकात प्रवासी अडकून पडत आहेत. दर्शक कायम स्वरुपी बंद ठेवणे योग्य आहे. – पी. एस. गोखले वास्तुशिल्पकार

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dombivlikar is already suffering from potholes including signal disruption in gharda circle amy
First published on: 25-07-2022 at 12:58 IST