US Tariff Threat to Bhiwandi Powerloom: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लागू केलेल्या ५० टक्के टॅरिफमुळे व्यापारविश्वातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. भारतातून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या मालावर हे ५० टक्के टॅरिफ लागू झाल्यामुळे भारतीय वस्तूंना अमेरिकेतील बाजारपेठेत वाढीव दरांच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. त्याचे पडसाद या कंपन्यांच्या भारतातील उत्पादन केंद्रांवर दिसू लागले असून असंच एक वस्त्र उत्पादनाचं केंद्र म्हणजे भिवंडी. ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे भिवंडीतील यंत्रमाग उद्योगावर मोठंच संकट ओढवलं आहे.

आधीच संकटात, त्यात टॅरिफचा आघात

गेल्या काही वर्षांपासून भिवंडीतील यंत्रमाग उद्योग आर्थिकदृष्ट्या डबघाईला आल्याचं दिसून येत आहे. कधीकाळी भारतातले मँचेस्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिवंडीतील हे उद्योग आर्थिक संकटांशी दोन हात करताना हवालदील झाले आहेत. करोनाकाळातील लॉकडाऊन, कापडासाठीच्या सुताचे अव्वाच्या सव्वा वाढलेले दर आणि विदेशातून आटलेली मागणी यामुळे आधीच संकटात असणाऱ्या भिवंडीतील यंत्रमाग उद्योगासमोर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ नावाचा यक्षप्रश्न उभा केला आहे. त्यामुळे भिवंडीतील हे उद्योग मरणासन्न अवस्थेस जाण्यास वेळ लागणार नाही, असं बोललं जात आहे.

इंडियन एक्स्प्रेसनं भिवंडीतील काही यंत्रमाग व्यावसायिकांशी संवाद साधल्यानंतर ट्रम्प यांच्या टॅरिफ अस्त्रामुळे इथल्या यंत्रमाग उद्योगाचं किती नुकसान झालंय, याची प्रचिती आली. गेल्या २० वर्षांपासून सतत इथल्या यंत्रमाग कारखान्यात काम करणारे मूळचे उत्तर प्रदेशचे रमेश साहानी सांगतात, “मला या यंत्रांच्या आवाजाची आता इतकी सवय झाली आहे की मी या आवाजात निर्धास्तपणे झोपूही शकतो. उलट ही यंत्रं चालायचं थांबलं की माझी झोप मोडते. त्याचा अर्थ काहीतरी चुकतंय”.

हजारो नोकऱ्यांवर संकट

गेल्या काही वर्षांपासून भिवंडीतील यंत्रमाग उद्योग आर्थिक संकटांचा सामना करत असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांनी ५० टक्के टॅरिफ लागू केल्यामुळे या उद्योगांचं उरलंसुरलं अवसानही संपू लागलं आहे. “हा उद्योग आधीच मरणासन्न अवस्थेला जाऊ लागला आहे. अनेकांनी त्यांचे कारखाने बंद केले आहेत. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेले टॅरिफ हा आमच्यावरचा शेवटचा आघात ठरेल”, अशी उद्विग्न प्रतिक्रिया १९४२ पासून ज्यांचं कुटुंब यंत्रमाग उद्योगात आहे, असे अक्रम अयुब अन्सारी यांनी दिली.

यंत्रमागावर किती रोजगार अवलंबून?

२०२४ मध्ये राज्य सरकारने नियुक्त केलेल्या समितीने दिलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात तब्बल १२.७ लाख यंत्रमाग कारखाने आहेत. या कारखान्यांमध्ये जवळपास ३० लाख कामगारांना रोजगार मिळतो. यामुळे महाराष्ट्रातील यंत्रमाग उद्योग देशभरातल्या सर्वात मोठ्या उद्योगांपैकी एक ठरला आहे. या ३० लाखांपैकी सर्वाधिक कामगार हे भिवंडीतील कारखान्यांमध्ये काम करतात.

भिवंडीतील यंत्रमागाला १६० वर्षांचा इतिहास!

१८५७ चा उठाव अयशस्वी ठरल्यानंतर उत्तर प्रदेशमधून जुलाहा आणि बुनकर या पारंपरिक विणकर समाजाचे लोक मोठ्या संख्येने तिथून महाराष्ट्रात आले. महाराष्ट्रात ते भिवंडी, मालेगाव आणि आसपासच्या भागात स्थिरावले. ८० च्या दशकात मुंबईतील कापड गिरण्यांना घरघर लागल्यानंतर भिवंडी हे कापड उद्योगाचं महत्त्वाचं केंद्र म्हणून पुढे आलं. त्यामुळेच भिवंडीला भारताचं मँचेस्टर म्हटलं जातं.