कल्याण, डोंबिवलीतील बहुतांशी भागात इमारत, सदनिका दुरुस्तीचे बांधकाम साहित्य सरसकटपणे गटारांमध्ये टाकले जात असून यामुळे अनेक ठिकाणी गटारांमधील पाण्याचा प्रवाह बंद झाल्याचे चित्र आहे. खाडी किनारी डेब्रीजचा भराव टाकणारे भूमाफियांमुळे पर्यावरणाची मोठी हानी होत असताना शहरातील गटारेही बांधकाम साहित्यामुळे तुंबण्याची भीती व्यक्त होत आहे.
नाले, गटारांमध्ये टाकण्यात आलेले बांधकाम साहित्यामुळे प्रवाह बंद झाल्याने गाळ, कचरा अडकून राहतो. सांडपाण्याचा प्रवाह पूर्णपणे थांबतो, अशा तक्रारी आता सफाई कामगार करू लागले आहेत. कल्याण रेल्वे स्थानकाजवळील सांगळेवाडी ते पत्रीपुलाजवळून रेल्वे मार्गालगत कल्याण रेल्वे स्थानक परिसरात साचलेले पाणी यापूर्वी सांगळेवाडी, रहेजा कॉम्पलेक्स ते पत्रीपुलाजवळून खाडीकडे वाहत जात होते. रेल्वे स्थानक भागातील गृहसंकुलांजवळील रहिवाशांनी सदनिका, इमारत दुरुस्तीचा मलबा मागील दहा ते पंधरा वर्ष सांगळेवाडी ते पत्रीपुला दरम्यानच्या खोलगट भागात सातत्याने टाकल्याने हा भाग पूर्णपणे बुजला आहे.
त्यामुळे या भागातून रेल्वे स्थानक भागातून वाहून येणारे पाणी खाडीकडे नेण्यास जागा उरलेली नाही. पावसाळ्यात या भागातील पाण्याचा सगळा प्रवाह सांगळेवाडी नाल्यातून वल्लीपीर रस्ता, लोकग्राम रस्त्याकडील नाल्याकडे वाहत येतो.
डोंबिवलीत नाले बुजविले
डोंबिवलीत घन:श्याम गुप्ते रस्त्यावर एका राजकीय पुढाऱ्याने आपली दुकाने थाटली आहेत. स्थानिक नगरसेवक दोन वर्षांपासून या नाल्यावरील अतिक्रमण व पाण्याचा प्रवाह अडविल्याविरोधात कारवाईची मागणी करीत आहेत. पण पालिकेतील सत्ताधारी पक्षाशी संबंधित हा पुढारी असल्याने पालिका अधिकाऱ्यांनी नाल्यावरील वाढीव बांधकामांवर कारवाई केली नाही. सागाव परिसरातील सांडपाणी वाहून आणणारे नाले भूमाफियांनी आयरे, भोपर भागात बेकायदा चाळी बांधताना बंदिस्त करून टाकले आहेत. पावसाळ्यात बंदिस्त नाल्यांमुळे पूरपरिस्थिती निर्माण होण्याची चिन्हे आहेत.