कामावर लक्ष ठेवण्यासाठी जबाबदार व्यक्ती नसल्याने दुर्घटना

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाईंदर : मीरा रोड येथील मलनिस्सारण केंद्रात तीन मजुरांचा बुधवारी गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली. मात्र ही घटना घडली त्या वेळी मजुरांच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी कोणतीही जबाबदार व्यक्ती घटनास्थळी उपस्थित नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या मजुरांचा मृत्यू निष्काळजीमुळे झाला असल्याचे स्पष्ट होत आहे.

भूमिगत गटार योजनेअंतर्गत मीरा रोड येथे बांधण्यात आलेल्या मलनिस्सारण केंद्रातील एका गटारात उतरलेल्या तीन मजुरांचा विषारी वायूमुळे गुदमरून मृत्यू झाला. गटारात उतरणे धोकादायक असल्याने हे काम जबाबदार तसेच माहितगार व्यक्तीच्या देखरेखीखाली होणे आवश्यक होते. परंतु मजूर गटारामध्ये उतरले, त्या वेळी एकही जबाबदार व्यक्ती त्या ठिकाणी उपस्थित नव्हती. त्यामुळे अवघी दोन मीटर खोली असलेल्या या गटारात तीन मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

महापालिकेने भूमिगत गटार योजनेचे काम एसपीएमएल या कंत्राटदाराला दिले आहे. योजना पूर्ण झाल्यानंतर मलनिस्सारण केंद्र चालवण्याची तसेच त्याची देखभाल करण्याची जबाबदारी पाच वर्षे कंत्राटदाराला देण्यात आली आहे. त्यानुसार प्रत्येक मलनिस्सारण केंद्रात कंत्राटदाराची माणसे नियुक्त करण्यात आली आहेत. केंद्रात दररोज होणारी कामे मजुरांकडून करवून घेतली जातात, त्यावर कामाची तांत्रिक माहिती असलेला मुकादम, त्यानंतर कंत्राटदाराचा अभियंता यांच्याकडून देखरेख ठेवण्यात येत असते. शिवाय महापालिकेने योजनेसाठी नियुक्त केलेल्या टंडन असोसिएट्स या सल्लागारावरही त्याची जबाबदारी असल्याची माहिती महापालिकेचे कार्यकारी अभियंता सुरेश वाकोडे यांनी दिली. याशिवाय कंत्राटदाराकडून काम व्यवस्थितपणे केले जात की नाही याची माहिती घेण्याचे काम महापालिकेचे कनिष्ठ आणि उपअभियंत्यांवर सोपवण्यात आले आहे. टंडन असोसिएट्सने मात्र मलनिस्सारण केंद्राची जबाबदारी आपल्यावर नसून भूमिगत गटार योजना सुरू असताना त्या कामावर देखरेख ठेवणे एवढीच जबाबदारी असल्याचा खुलासा केला आहे.

मुळात कामासाठी आणलेले मजूर बाहेरून आणण्यात आले होते आणि त्यांना या कामाची कोणतीही माहिती नव्हती. त्यामुळे मजुरांनी तज्ज्ञ व्यक्तींच्या देखरेखीखालीच काम करणे आवश्यक होते. असे झाले असते तर बुधवारी झालेली घटना घडलीच नसती, असे जाणकारांचे म्हणणे आहे. गटारात बसवण्यात आलेले व्हॉल्व्ह गटाराबाहेर उभे राहूनही हाताळता येतात त्यामुळे मजुरांना गटारात उतरण्याची आवश्यकताच नव्हती, असे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. गटारात मिथेनसारखा विषारी वायू साठून राहण्याची नेहमीच शक्यता असते. त्यामुळे मजुरांना गटारात उतरण्यास कोणी सांगितले याबाबत प्रशासनाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.

रहिवाशांचा संताप

हे केंद्र सहा महिन्यांपासून प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आले आहे. परंतु केंद्रातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे आसपासच्या रहिवाशांचा प्रचंड त्रास होत असल्याने त्यांनी केंद्राला सुरुवातीपासूनच विरोध केला आहे. बुधवारी ही घटना घडल्यानंतर संतप्त झालेल्या रहिवाशांनी गुरुवारी आयुक्त बालाजी खतगांवकर यांची भेट घेऊन केंद्र बंद करण्याची मागणी केली. दुर्गंधीमुळे अनेक रहिवासी आजारी पडत असतात, केंद्राभोवती कोणतीही संरक्षक भिंत नसल्याने आत बांधण्यात आलेल्या मोठय़ा विहिरींमध्ये पडून अपघात होण्याची भीती आहे, अशा तक्रारी रहिवाशांनी केल्या. केंद्राच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी करून रहिवाशांना दुर्गंधीचा त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल, असे आश्वासन आयुक्तांनी या वेळी रहिवाशांना दिले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drainage workers death in mira road due to negligence
First published on: 18-01-2019 at 02:56 IST