टंचाईची सबब सांगून सर्वच जिन्नसांच्या दरांत बेसुमार वाढ

ठाणे: करोनाच्या टाळेबंदीमुळे एकीकडे तुटवडय़ाच्या भीतीने सर्वसामान्य नागरिक आवश्यकतेपेक्षा अधिक सामान खरेदी करण्यासाठी झुंबड करत असताना किराणा दुकानदारांनीही याच भीतीचा गैरफायदा उठवण्यास सुरुवात केली आहे. मुंबई, ठाणे आणि आसपासच्या शहरांना धान्य तसेच डाळींचा पुरवठा करणाऱ्या वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धान्य बाजारात जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा उपलब्ध असतानाही टंचाई असल्याचे सांगत किरकोळ विक्रेते धान्य तसेच डाळींच्या दरांत अवाजवी वाढ करू लागले आहेत.  ठाण्यातील घोडबंदर तसेच इतर परिसरात असलेल्या घाऊक मालाची विक्री करणाऱ्या बडय़ा मॉलमध्येही डाळी आणि अन्नधान्याचा तुटवडा असल्याची कारणे पुढे केली जात असून ग्राहकांना मागणीच्या तुलनेत ५० ते ७५ टक्केच मालाची खरेदी करण्याची मुभा दिली जात आहे. काही किराणा मालाच्या दुकानात तर डाळी किलोमागे १५० रुपयांपेक्षा अधिक रकमेने विकल्या जात असून उत्तम प्रतीची तूरडाळ १७० ते १८० रुपयांनी विकली जात आहे.

देशात आणि राज्यात टाळेबंदी लागू झाल्यानंतरही राज्यात जीवनवाश्यक वस्तूंचा तुटवडा भासू देणार नाही असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून वारंवार दिले जात आहे. वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील घाऊक बाजारात मुंबई, ठाण्यात किमान दोन महिने पुरेल इतका अन्नधान्याचा साठा आहे. असे असतानाही ठाणे आणि आसपासच्या शहरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून अन्नधान्याची टंचाई निर्माण झाल्याचे चित्र उभे केले जात आहे.

टाळेबंदीच्या अगदी पहिल्या दिवसांपासून मोठय़ा दुकानांमध्ये उत्तम प्रतीची तूरडाळ प्रतिकिलो १०० रुपयांना विकली जात होती. नंतरच्या काळात घाऊक बाजारांमध्ये तुरडाळीचे दर वाढू लागताच सद्यस्थितीत काही दुकानदार उत्तम प्रतीची तूरडाळ १५० ते १७० रुपये किलो या दराने विकत असून कमी प्रतीची डाळही १२० रुपयांना ग्राहकांना विकत घ्यावी लागत आहे. घाऊक बाजारात डाळींची चढय़ा दराने विक्री होत असल्याच्या तक्रारी किरकोळ विक्रेते करत असून मूगडाळ (१६०), चणाडाळ (११० रुपये), उडद डाळ (१६० रुपये), राजमा (१४० रुपये), मसूर डाळ (१५०) अवाच्या सवा दराने विकली जात आहे. ठाण्यातील बडय़ा मॉलमधील किराणा विक्रीच्या अस्थापनांमध्ये अन्नाधान्याच्या किंमती तुलनेन स्थिर असल्या तरी तेथेही मागणीच्या प्रमाणात पुरवठा होत नसल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सद्यस्थितीला दिवसभरात धान्याच्या ३०० गाडय़ा वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत दाखल होत असून हा साठा पुरेसा आहे. मुंबई, ठाण्याला पुढील काही महिने पुरेल इतका धान्यसाठा घाऊक बाजारात आहे. शिवाय घाऊक बाजारातून दररोज मोठय़ा प्रमाणावर धान्य मुंबई, ठाण्याच्या दिशेने रवाना होत आहे. त्यामुळे कोणतीही टंचाई नाही. किरकोळ बाजारातील दरवाढीवर बाजार समितीचे नियंत्रण नसते.

अविनाश देशपांडे, सहसचिव मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती