ठाणे स्थानक परिसर फेरीवालामुक्त करण्यासंबंधी राबविण्यात आलेल्या सर्वच योजना फसल्यानंतर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आता फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे स्थानक परिसरासह शहरातील महत्त्वाच्या भागांमध्ये ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने फेरीवाल्यांवर पाळत ठेवून कारवाई करण्याचे आदेश त्यांनी शनिवारी बैठकीमध्ये संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे स्थानक परिसरात काही महिन्यांपूर्वी रस्ता रुंदीकरण मोहीम राबविण्यात आली. त्यानंतर या भागात फेरीवाल्यांच्या संख्येत वाढ झाल्याच्या तक्रारी महापालिकेकडे येऊ लागल्या आहेत. तसेच ठाणे स्थानक परिसरातील रस्ते फेरीवाले व्यापत असल्यामुळे त्या ठिकाणाहून नागरिकांना चालणे शक्य होत नाही. तसेच वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. त्यामुळे स्थानक परिसर फेरीवालामुक्त करण्यासाठी महापालिकेने विविध योजना राबविल्या. त्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे तसेच सुरक्षारक्षकांची नेमणूक केली. मात्र, त्यानंतरही या भागात फेरीवाल्यांचा वावर कमी झालेला नाही. त्यामुळे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी स्थानकातील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या पथकाची नेमणूक केली आणि या पथकांना कारवाईसाठी प्रत्येक दिवशी वार ठरवून देण्यात आले होते. प्रत्येक दिवशी ठरलेल्या वारानुसार संबंधित पथक कारवाई करीत आहे. मात्र, या पथकाच्या नेमणुकीनंतरही हा परिसर फेरीवालामुक्त होऊ शकला नसून फेरीवालामुक्तीसाठी महापालिकेने राबविलेल्या सर्वच योजना अपयशी ठरल्या आहेत. या सर्वच योजना फसल्यानंतर आयुक्त जयस्वाल यांनी आता ड्रोन कॅमेऱ्यांची मदत घेण्याचा निर्णय घेतला असून त्याद्वारे ठाणे स्थानकासह विविध भागात असलेल्या फेरीवाल्यांवर नजर ठेवण्यात येईल.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drone camera in thane
First published on: 15-01-2017 at 01:23 IST