मीरा-भाईंदर महानगरपालिकेची योजना, नव्या मालमत्तांचाही शोध

सातत्याने वाढणाऱ्या अनधिकृत बांधकामांवर आता ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने नियंत्रण ठेवण्याचा निर्णय मीरा-भाईंदर महापालिकेने घेतला आहे. शासन निर्णयानुसार प्रत्येक महापालिकेला ई गव्हर्नन्स राबविणे आवश्यक झाले आहे. त्यामुळे ई गव्‍‌र्हनन्स कामी तांत्रिक सल्लागार नेमण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण तसेच महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी नव्या मालमत्तांचा शोध घेतला जाणार आहे.

मीरा-भाईंदर हे सुरुवातीपासूनच अनधिकृत बांधकामांसाठी प्रसिद्ध आहे. गेल्या चार ते पाच वर्षांपासून त्यावर काही प्रमाणात नियंत्रण आले असले तरी आजही अनधिकृत झोपडय़ा आणि चाळी उभारण्याचे काम सुरूच आहे. महापालिका अधिकाऱ्यांच्या आशीर्वाद या बांधकामांना असतो हे वारंवार उघड झाले आहे. यासाठीच आता ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने संपूर्ण शहराचे सर्वेक्षण केले जाणार आहे. या सर्वेक्षणानंतर शहराचा परिपूर्ण असा नकाशा तयार केला जाणार आहे. या नकाशात दर्शविलेल्या बांधकाम क्षेत्रात कोणताही बदल झालेला आढळला तर त्या बांधकामाची तात्काळ चौकशी केली जाणार आहे आणि ते अनधिकृत असल्याचे आढळल्यास त्यावर प्रशासनाकडून कारवाई केली जाणार आहे.

याव्यतिरिक्त ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून कागदपत्रांचे डिजिटायझेशन, शहर वायफाय करणे, व्हिडीओ कॉन्फरन्सिंग, वृक्ष गणना, महापालिकेची देयके मोबाइलद्वारे भरण्यासाठी मोबाइल अ‍ॅप्लिकेशन अशा अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. शासनाच्या नगरविकास सचिव मनीषा म्हैसकर आणि माहिती तंत्रज्ञान सचिवांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम प्रशासनाने हाती घेतला आहे. मे. केपीएमजी यांची तांत्रिक सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

मालमत्ता करात भरघोस वाढ होण्याचा दावा

ट्र व्होटर अ‍ॅपचा प्रभावी वापर सध्या महापालिका निवडणुकीसाठी महापालिकेने ट्र व्होटर या मोबाइल अ‍ॅपचा वापर सुरू केला आहे. हे अ‍ॅप केवळ निवडणुकीपुरतेच राहणार नसून निवडणुकीनंतरही त्याचा वापर सुरूच राहणार आहे. अ‍ॅपच्या माध्यमातून प्रशासनाला नागरिकांचा डाटा उपलब्ध होणार आहे. त्याच्या मदतीने नागरिकांची महापालिकेशी संबंधित विविध माहिती देणारे एक विशिष्ट कार्ड प्रशासन विकसित करणार आहे. या कार्डच्या मदतीने नागरिकांना महापालिकेशी व्यवहार करणे सुलभ होणार आहे. यासाठी अधिकाधिक नागरिकांनी आपल्या मोबाइलवर ट्र व्होटर अ‍ॅप डाऊनलोड करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.