भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या नावाने ठाणे महापालिकेने महात्मा फुलेनगर भागात मोठा गाजावाजा करत मिनी क्रीडा संकुल उभारले खरे, मात्र येथे क्रीडापटूंची भावी पिढी उभी राहण्याऐवजी गर्दुल्ले नशेच्या अमलाखाली ‘आडवे’ होत आहेत. काही महिन्यांपासून गांजा तसेच ‘एमडी’ अशा आरोग्यास घातक असलेल्या व्यसनांच्या आहारी गेलेल्या तरुणांनी क्रीडा संकुलात अड्डा बनवण्यात सरावले आहेत.
सायंकाळी क्रीडा संकुलाच्या मैदानामध्ये नशा करण्यासाठी तरुणांचे जथ्थेच्या जथ्थे जमू लागले आहेत. या प्रकारामुळे परिसरातील रहिवासी हैराण झाले असून त्याकडे महापालिका प्रशासन आणि पोलिसांचा कानाडोळा होत आहे.
ठाणे शहरात चांगल्या दर्जाचे क्रीडापटू तयार व्हावेत यासाठी महापालिकेने काही वर्षांपूर्वी महात्मा फुलेनगर भागातील मोकळ्या मैदानावर क्रीडा संकुल उभारले. लोकमान्यनगर, सावरकरनगर, इंदिरानगर, ज्ञानेश्वरनगर या भागातील क्रीडापटूंना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे हा यामागील प्रमुख उद्देश होता. क्रीडापटूंचा उत्साह वाढावा यासाठी क्रीडा संकुलास मास्टरब्लास्टर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याचे नाव देण्यात आले. सचिनच्या नावाने भारतात तयार करण्यात आलेली पहिली वास्तू असल्याचा गौरव त्यावेळी करण्यात आला. या संकुलातून भावी क्रीडापटू तयार होतील, अशी आशा होती. मात्र, ती आता फोल ठरल्याचे उघड झाले आहे. संकुलाच्या मैदानाला गांजा आणि एमडी पावडरच्या नशेबाजांनी वेढा घातला आहे. क्रीडा संकुलाच्या आवारात व्यायामशाळा, नागरिकांना चालण्यासाठी पदपथ, दिवे, रंगमंच, प्रेक्षागृहे (गॅलरी) आदी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. व्यायामशाळेचा अपवाद वगळला तर इतर सोयीसुविधांची मोठय़ा प्रमाणात नासधूस झाल्याचे चित्र दिसू लागले आहे. मीनाताई ठाकरे उद्यानाच्या मागील बाजूने आणि महात्मा फुलेनगरातील गगनेश इमारतीकडून जाणारा रस्ता अशा दोन बाजूने या क्रीडा संकुलास प्रवेशद्वार आहेत. त्यातील मीनाताई ठाकरे उद्यानाकडील प्रवेशद्वार कायम बंद असते. त्या प्रवेशद्वाराचे लोखंडी गज तोडून टाकले असून त्यातून दारूडे, गर्दुल्ले क्रीडा संकुलामध्ये प्रवेश करतात. क्रीडा संकुलच्या सुरक्षेसाठी नेमलेले सुरक्षारक्षकही येथे नसतात. यामुळे या प्रवेशद्वाराला खेटून असणाऱ्या सुरक्षारक्षकाच्या चौकीतच बसून हे तरुण आपला कार्यभाग साधताना दिसून येतात. प्रेक्षागृहाचा आडोसा घेत दारू पिणे, पत्त्यांचे डाव रंगवणे असे प्रकार येथे घडतात, अशी माहिती रहिवाशांनी दिली.
विनीत जांगळे, ठाणे
तरुणमंडळी प्रेक्षागृहाच्या सावलीत मागील बाजूला क्रिकेट खेळतात. त्याचा म्हाडा सोसायटीत राहणाऱ्या रहिवाशांना नेहमीच मनस्ताप होतो. यामुळे प्रेक्षागृहाच्या खालील भागात असणाऱ्या खोल्यांच्या काचा चेंडू लागून फुटल्याचे प्रकार घडले आहेत. क्रीडा संकुलमधील अनेक दिवे हे बंद अवस्थेत आहेत. संध्याकाळी आठ ते रात्री दहा या दरम्यान तरुण मुली, गृहिणी मीनाताई ठाकरे उद्यानाच्या मागील बाजूकडील क्रीडा संकुलच्या प्रवेशद्वाराजवळून जाऊ शकत नाहीत, इतकी गर्दुल्ल्यांची टोळकी या भागात असते. येथून काही मिनिटाच्या अंतरावर असणाऱ्या जयभवानीनगर भागातील धर्मवीर उद्यानाचा आदर्श महापालिकेने घ्यावा. दरवर्षी शिवजयंती, हनुमानजयंती साजरी करताना सचिनच्या नावाला काळिमा फासला जाणार नाही, याचीही काळजी घ्यावी.
-दिलीप भिंगार्डे, (सचिव) जय रिद्धी-सिद्धी अपार्टमेंट