या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे ते बदलापूपर्यंत पोलिसांची मोहीम

ठाण्यातील निसर्गरम्य आणि शांत परिसर असलेल्या येऊर तसेच उपवन परिसरात अमली पदार्थाची विक्री आणि सेवन होत असल्याची बाब कारवाईतून समोर आल्यानंतर ठाणे पोलिसांनी आता शहरांमधील अशा प्रकारचे अड्डे उद्ध्वस्त करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या दोन्ही ठिकाणांसह ठाणे ते बदलापूपर्यंतच्या शहरात ही मोहीम राबविण्यात येत असून येत्या ३१ डिसेंबपर्यंत ही मोहीम सुरू राहणार असल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली. या मोहिमेदरम्यान अमली पदार्थ विक्रीची टोळी हाती लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

नववर्ष स्वागताच्या पूर्वसंध्येला दरवर्षी ठाणे आणि मुंबईतील हॉटेल, फार्म हाऊस तसेच पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पाटर्य़ाचे आयोजन करण्यात येते. अशा पाटर्य़ामध्ये अमली पदार्थाचे सेवन केले जात असल्याची बाब यापूर्वीच्या पोलीस कारवाईतून अनेकदा समोर आली आहे. त्यामुळे ३१ डिसेंबरला आयोजित केल्या जाणाऱ्या पाटर्य़ावर पोलिसांची नजर असते. असे असले तरी गेल्या काही वर्षांपासून शहराच्या विविध भागांत अमली पदार्थ विक्री आणि सेवन करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. अशाच प्रकारे ठाण्यातील येऊर तसेच उपवन तलाव परिसरातून पोलिसांनी अमली पदार्थाचा साठा जप्त केला आहे. दोन दिवसांपूर्वी या ठिकाणी एलएसडी पेपर आणि एमडी पावडर या अमली पदार्थाच्या विक्रीसाठी आलेल्या चौघांना ठाणे पोलिसांनी अटक केली होती. यामुळे येऊर तसेच उपवन तलाव परिसर अमली पदार्थ विक्री आणि सेवनाचा अड्डा बनू लागल्याचे बोलले जात आहे. शहराच्या विविध भागांतील निसर्गरम्य ठिकाणीही असेच प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे येऊ लागल्या आहेत. राबोडी येथे युनिट एकने दोन आठवडय़ांपूर्वी मेथेएम्फेटाईन या अमली पदार्थाच्या १२८ गोळ्या जप्त केल्या होत्या. जून महिन्यात वर्तकनगर येथे २५ एलएसडी पेपर विक्रीसाठी आलेल्या दोघांना पोलिसांनी अटक केली होती, तर मुंब्रा येथेही एका घरातून मोठय़ा प्रमाणात गांजा जप्त करण्यात आला होता. कल्याण येथील दुर्गाडी भागात पोलिसांनी दोन जणांकडून २० किलो गांजा जप्त केला होता. या पाश्र्वभूमीवर ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे अमलीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पोवार यांनी आता विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला असून त्यामध्ये ठाणे ते बदलापूपर्यंतच्या शहरातील अमली पदार्थ विक्री आणि सेवनाचे अड्डे उद्ध्वस्त केले जाणार आहेत. या मोहिमेसाठी विशेष पथकांची नेमणूक करण्यात आली असून त्यामार्फत शहरामध्ये गस्त घालणार आहेत.

अमली पदार्थ विक्री आणि सेवन करणाऱ्यांविरोधात आमच्या पथकाची कारवाई सुरूच असते. मात्र, आता कारवाई आणखी प्रभावीपणे राबविली जाणार असून त्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यामुळे अमली पदार्थ विक्री आणि सेवनाला आळा बसू शकतो. – विजय पोवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ठाणे अमली पदार्थविरोधी पथक

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drug addicted items akp
First published on: 29-11-2019 at 02:22 IST