|| भगवान मंडलिक
नवीन पिकांच्या लागवडीचा अंदाज येत नसल्याने अनेकदा शेतकऱ्यांना नुकसान
कल्याण : सप्टेंबरमध्ये पावसाचा चार महिन्यांचा हंगाम संपून भात कापणीची वेळ येऊन ठेपली तरी पाऊस ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांतही पडत असतो. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून परतीच्या पाऊस लांबत असल्यामुळे ठाणे जिल्ह्याातील बहुतांशी शेतकरी ६० ते ९० दिवसांची भात पिके घेण्याऐवजी १२० ते १६० दिवसांची पिके घेण्याकडे वळू लागली आहेत.
यापूर्वी सप्टेंबरमध्ये परतीचा पाऊस माघारी निघून गेला की शेतकरी भात ठेवण्यासाठी घर परिसरात, शेतावर खळी तयार करून ठेवत असे. शेतात तयार झालेले भात वेळेत कापून त्याची झोडणी करून ते खाण्यासाठी तसेच काही विक्रीसाठी राखून ठेवत असत. काही शेतकरी भात शासकीय खरेदी केंद्रात विकतात. गेल्या काही वर्षांत सप्टेंबरमध्ये माघारी जाणारा परतीचा पाऊस ऑक्टोबरमध्ये मुसळधार पडतो. नोव्हेंबरमध्ये मोठ्या सरी येतात. त्यामुळे जून-जुलैमध्ये लागवड केलेली ९० दिवसांची भात पिके पावसाच्या सततच्या माऱ्याने शेतात कोसळून पडतात. भाताचा लोंगव्यामधील दाणा कापणीची वेळ (टक) निघून गेल्यामुळे गळून पडतो. शेतात तयार झालेले पीक सप्टेंबर-ऑक्टोबरमध्येही पाऊस कोसळत असल्याने शेतकऱ्यांना कापता येत नाही. ते ठेवण्यासाठी खळ्याची व्यवस्था करता येत नाही. तयार झालेले पीक कापून घरात सुरक्षित ठेवण्यासाठी जागा नसल्याने शेतकरी भात पीक शेतात उभे राहील याची काळजी घेतो. पाऊस कमी झाला नाही तर पिकांचे नुकसान होते, असे शेतक ऱ्यांनी सांगितले.
यापूर्वी दसरा झाल्यानंतर शेतकरी भात पीक ठेवण्यासाठी खळी करत असे. अलीकडे दसरा, दिवाळीनंतरही पाऊस सुरू राहतो. त्यामुळे खळी करण्यात अडचणी येतात. काही वर्षांपूर्वी शेतकरी मालकोळंब्या, टायचून, महाडी (पटणी) या लागवडीनंतर ४० ते ५० दिवसांत येणारी भात पिके माळरान, डोंगर खाचरांमध्ये लावत होता. ही पिके अलीकडे वाडा, मुरबाड, ठाणे, पालघरमधील काही मोजके शेतकरी घेतात, असे मुरबाडमधील शेतकरी शाम पष्टे यांनी सांगितले. नवीन पिके अलीकडे बाजारात विक्रीसाठी येतात. या पिकांवर लागवडीचे दिवस लिहिलेले असतात. या नवीन पिकांच्या लागवडीचा अंदाज नसल्याने अनेक वेळा ही पिके लवकर तयार होतात किंवा या पिकांच्या लागवडीची जागा चुकल्याने अनेक शेतक ऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागते. त्यामुळे नवीन पिकांची जोखीम घेण्यास शेतकरी तयार नसतो. नवीन पिके काही वेळा भरघोस पीक देतात. ही पिके किती दिवसांत तयार होतील अशी मनात भीती असल्याने शेतकरी ही पिके लागवड करताना विचार करतात, असे पष्टे यांनी सांगितले.
हळवार जमिनीत (९० दिवसाचे पीक) यापूर्वी शेतकरी झिनी भात पिकाची लागवड करीत होता. या पिकावर खोडकिडा पडण्याचे प्रमाण वाढू लागल्याने हळूहळू शेतकऱ्यांनी या पिकाची लागवड थांबवली. हा भात प्रकार अलीकडे वाडा भागात अधिक प्रमाणात दिसतो. हळव्या जमिनीत शेतकरी दप्तरी, पूनम, मोहर, निमगरव्या जमिनीत रुपाली, पूजा, अतिगरव्या वाणातील रत्ना, गुजराथ अकरा, सुवर्णा, मसुरी, कर्जत दोन ही पिके घेतो. निमगरवी पिके ११० ते १२० दिवसांत तयार होतात. अतिगरवी पिके १४० ते १६० दिवसांत तयार होतात. त्यामुळे परतीचा पाऊस लांबला तरी शेतकरी लांबलेला पाऊस थांबल्यानंतर कापणीचा हंगाम सुरू करतो. तयार पीक हातात आल्याने केलेली मेहनत लाभदायी ठरते.
मजुरीचे वाढते दर, लांबणीवर पडत असलेला परतीचा पाऊस, त्यामुळे शेतकरी कमी मेहनतीत जास्तीत भात पीक कसे येईल याचे नियोजन करून अलीकडे एक टोकन, जपानी भात लागवड, चारसूत्री, एकसूत्री पद्धतीचा अवलंब करीत आहे. काही वर्षांत परतीचा पाऊस वेळेत जात नसल्याने शेतकरी १२० दिवसांहून अधिक लागवडीची पिके घेण्याकडे वळू लागला आहे.
– शाम पष्टे, शेतकरी, मुरबाड