महापालिकेच्या वतीने चार ठिकाणी उपक्रम
आजच्या काळात इंटरनेट हा विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अविभाज्य घटक बनला आहे. मात्र, प्रत्येक विद्यार्थ्यांला सायबर कॅफेत जाऊन खर्च करणे परवडणारे नसते. ही अडचण लक्षात घेऊन मीरा भाईंदर महापालिकेने शहरात चार ई वाचनालये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या वाचनालयांतील इंटरनेट सुविधेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक तसेच अभ्यासक्रमाशी संबंधित संकेतस्थळांना भेट देणे तसेच तेथील माहिती घेणे शक्य होणार आहे.
सध्याच्या शिक्षणक्रमात ‘प्रोजेक्ट’ हा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. असे प्रोजेक्ट करण्यासाठी विद्यार्थ्यांना अनेकदा इंटरनेटची मदत घ्यावी लागते. अलीकडे बहुतांश घरांतच इंटरनेट उपलब्ध असले तरी गरीब घरांतील विद्यार्थ्यांना अशी सुविधा मिळत नाही. तसेच सायबर कॅफेमध्ये जाऊन इंटरनेट हाताळण्याचा खर्चदेखील या विद्यार्थ्यांना परवडत नाही. या पाश्र्वभूमीवर मीरा-भाईंदर महापालिकेने ‘ई वाचनालये’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या वतीने याआधीच विद्यार्थ्यांसाठी वातानुकूलित अभ्यासिका सुरू करण्यात आल्या आहेत. या अभ्यासिकेत इंटरनेटची सुविधा पुरवण्यात येईल. या सुविधेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक संकेतस्थळे हाताळता येतील. तसेच इंटरनेटवरील संदर्भ ग्रंथ तसेच ई पुस्तकेही विद्यार्थ्यांना उपलब्ध होतील.
भाईंदर पश्चिमेकडील नगरभवन, मीरा रोड येथील रामनगर व कनाकिया येथील महापालिकेचे कार्यालय तसेच काशीगाव येथे ही ई वाचनालय सुरू करण्यात येणार आहेत. यासाठी पंचाहत्तर लाख रुपये खर्च करण्यात येणार असून त्याची कामे सुरू झाली आहेत. येत्या डिसेंबर महिन्यात ही ई वाचनालये तयार होणार आहेत. प्रत्येक ई वाचनालयात पाच संगणक तसेच ५० ते ६० विद्यार्थी क्षमतेची आसन व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पुढच्या टप्प्यात खारीगाव तसेच महानगरपालिकेच्या मीरा रोड येथील रुग्णालयातील वाचनालयातही ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.