डोंबिवली – डोंबिवलीतील एका अंडी विक्री व्यावसायिकाची तमीळनाडूतील व्यावसायिकाने अंडी विक्री व्यवसायाच्या माध्यमातून ३२ लाख ५० हजार रूपयांची फसवणूक केली आहे. या फसवणूक प्रकरणी डोंबिवलीतील अंडी विक्री व्यावसायिकाने गुरुवारी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

कामदेव अविनाश जोशी असे डोंबिवलीतील अंडी विक्री व्यावसायिकाचे नाव आहे. ते डोंबिवली जीमखाना परिसरात राहतात. तमीळनाडू राज्यातील तिरूचापल्ली, प्रकाशनगर भागात राहत असलेल्या व्यंकट राजा यांच्या विरुध्द व्यावसायिक जोशी यांनी आर्थिक फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. जानेवारी २०२४ ते मे २०२४ या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे.

व्यावसायिक कामदेव जोशी यांनी मानपाडा पोलीस ठाण्यातील प्राथमिक तपासणी अहवालात म्हटले आहे, की तमीळनाडूतील तिरूचापल्ली येथील व्यंकट राजा यांना आपण दुबई येथे अंडी विक्री करण्यासाठी ३२ लाख ५० हजार रूपये दिले होते. परंतु, गुन्हा दाखल व्यंकट राजा यांनी अंडी विक्री व्यावसायिक कामदेव जोशी यांना आपणास कोणतीही पूर्वकल्पना न देता, आपणास अंधारात ठेऊन व्यंकट राजा यांनी भारत देशात अन्य व्यावसायिकांना परस्पर अंडी विक्री केली.

हा प्रकार उघडकीला आल्यानंतर व्यंकट राजा यांनी कामदेव जोशी यांच्या सोबत ठरलेल्या व्यवहाराप्रमाणे जोशी यांना अंडी देण्याचे ठरले होते. परंतु, व्यंकट राजा यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे आणि ठरलेल्या व्यवहाराप्रमाणे डोंबिवलीतील कामदेव जोशी या व्यावसायिकाला अंडी परत दिली नाहीच, पण त्यांनी अंडी विक्रीसाठी दिलेले ३२ लाख ५० हजार रूपयेही परत केले नाहीत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्यवहार पूर्ण करण्यासाठी, दिलेले पैसे परत करण्यासाठी व्यावसायिक जोशी यांनी गेल्या वर्षभरात व्यंकट राजा यांच्याकडे तगादा लावला होता. वारंवार मागणी करूनही व्यंकट राजा ३२ लाख ५० हजार रूपये परत करत नसल्याने ते आपली पसवणूक करत असल्याची खात्री पटल्याने व्यावसायिक कामदेव जोशी यांनी गुरुवारी व्यंकट राजा यांच्या विरुध्द आर्थिक फसवणुकीची तक्रार मानपाडा पोलीस ठाण्यात केली. पोलीस निरीक्षक जयपालसिंह गिरासे याप्रकरणाचा तपास करत आहेत.