ठाणे जिल्हा परिषदेवर भगवा; एकनाथ शिंदे यांच्या व्यूहरचनेला यश
ठाणे जिल्ह्य़ातील भाजपच्या वाढत्या वर्चस्वाला सुरुंग लागावा यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा परिषद निवडणुकांच्या निमित्ताने जिल्ह्य़ातील ग्रामीण भागात हाती घेतलेले सर्वपक्षीय ‘भाजप पाडा’ अभियान कमालीचे यशस्वी ठरल्याचे गुरुवारी निकालानंतर स्पष्ट झाले. जेथे शिवसेनेची ताकद आहे तेथे स्वतंत्र्यपणे आणि जेथे ताकद कमी तेथे काँग्रेस-राष्ट्रवादीला सोबत घेत भाजपला अंगावर घेण्याची रणनीती शिंदे यांनी या निवडणुकीत आखली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून संपूर्ण जिल्ह्य़ात ऐटीत मिरविणारे भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांच्याविरोधात पक्षात आणि पक्षाबाहेर असलेली नाराजी एका झेंडय़ाखाली आणताना शिंदे यांनी दाखविलेल्या राजकीय मुत्सद्दीपणाची चर्चा आता रंगली असून ठाणे जिल्ह्य़ात यानिमित्ताने सुरू झालेला भाजपविरोधी महायुतीचा प्रयोग यानिमित्ताने केंद्रस्थानी आला आहे.
ठाणे जिल्हा परिषदेच्या ५२ आणि पंचायत समितीच्या १०६ जागांसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी आणि काही ठिकाणी काँग्रेस आघाडीने एकहाती विजय मिळवला. नरेंद्र मोदी यांच्या लाटेतही ठाणे आणि कल्याण डोंबिवली यासारख्या महापालिकांवर शिवसेनेने सत्ता काबीज केल्यानंतर जिल्ह्य़ातील ग्रामीण भागातील मतदार नेमका कुणाच्या बाजूने कल देतात याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. ठाणे जिल्हा परिषदेवर अगदी काही वर्षांपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होते. मात्र, खासदार कपिल पाटील आणि मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी भाजपची साथ धरल्याने ग्रामीण भागातील राष्ट्रवादीचा कणाच मोडून पडला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच होत असलेल्या या निवडणुकीनिमीत्त पाटील आणि कथोरे यांच्या बळावर भाजप यंदा कधी नव्हे ते जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करण्याच्या बाता मारत होता. केंद्र आणि राज्यातील सत्तेत सहभागी असूनही शिवसेनेला काडीची किंमत मिळत नसल्याने पक्षात अस्वस्थता आहे. भिवंडी लोकसभा निवडणुकीत कपिल पाटील यांच्या विजयात शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी झोकून काम केले होते. असे असताना पाटील आता आम्हाला जुमानत नाहीच, शिवाय उठल्यासुटल्या मुख्यमंत्र्यांया नावाने ‘आवाज’ देतात अशी भावना शिवसैनिकांमध्ये होती. त्यामुळे यंदा काहीही झाले तरी भाजप आणि कपिल पाटील यांना धडा शिकवायचा असा बेत स्थानिक नेत्यांनी आखला होता. मात्र सत्तेत असलेल्या भाजपला कात्रजचा घाट दाखवायचा असेल तर एकटे लढून उपयोग नाही. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या न्यायाने काँग्रेस, राष्ट्रवादीला सोबत घ्या हे स्थानिक नेत्यांच्या गळी उतरविण्यात एकनाथ शिंदे यशस्वी ठरले आणि याच महायुतीने भाजपला पराभवाची धूळ चारल्याचे आता स्पष्ट होत आहे.
शहापुरात लढाई.. इतरत्र युती
जिल्हा परिषदेतील ५२ जागांपैकी शहापुरात १४, तर भिवंडी तालुक्यात २१ अशा ३५ जागा निर्णायक ठरतील याची कल्पना असलेल्या शिवसेना नेत्यांनी भिवंडीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसला एकत्र घेतले. मुरबाडमध्ये किसन कथोरे यांच्याशी दोन हात करण्यासाठी तुलनेने तुल्यबळ असलेल्या राष्ट्रवादीला अधिक जागा सोडण्यात आल्या, तर शहापुरात खिजगणतीतही नसलेल्या भाजपकडे कानाडोळा करत राष्ट्रवादीसोबत दोन हात करण्याचा निर्णय पालकमंत्री शिंदे यांनी घेतला. काहीही झाले तरी कपिल पाटील यांना धडा शिकवायचा असा विडा उचलत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनीही शिवसेनेला पुरेपूर साथ दिली. अंबरनाथ, कल्याण तालुक्यातही महायुतीचा हा प्रयोग शक्य तिथे राबविण्यात आला आणि यशस्वीही ठरला. जिल्हा परिषदेच्या शहापूर, भिवंडी, अंबरनाथ गटात भाजपला मोठय़ा पराभवाचे तोंड पाहावे लागले. दीड वर्षांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या कपिल पाटील यांना हा इशारा मानला जात असून जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीला सत्तेत घेऊन भाजपविरोधी महायुतीचा हा प्रयोग सुरूच राहील अशा पद्धतीची व्यूहरचना पालकमंत्री शिंदे यांनी केल्याचे दिसत आहे.