ठाणे : ठाणे जिल्ह्याला एकनाथ शिंदे यांच्या रूपाने मुख्यमंत्रीपदाचा बहुमान मिळाला असून यानिमित्ताने ठाण्यातील विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असणाऱ्या सेवाभावी संस्थांतर्फे शिंदे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर त्यांची प्रकट मुलाखत, गौरवग्रंथाचे प्रकाशन, गौरवगीताचे सादरीकरण होणार आहे. तसेच कार्यक्रमापूर्वी शिंदे यांच्या मिरवणुकीचेही आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ‘मुख्यमंत्री जनगौरव समिती’चे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शनिवार, १३ ऑगस्टला सायंकाळी ६ वाजता डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहात हा कार्यक्रम पार पडणार आहे. यामध्ये ठाण्यातील कला, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, वैद्यकीय, औद्योगिक आदी विविध क्षेत्रांतील दीडशेहून अधिक संस्थांच्या पुढाकाराने शिंदे यांचा हा  सत्कार करण्यात येत आहे. या कार्यक्रमास ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, त्र्यंबकेश्वरच्या अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे पिठाधीश अण्णासाहेब मोरे आणि कोल्हापूरच्या कणेरी येथील सिद्धगिरी मठाचे मठाधिपती काडसिद्धेश्वर स्वामी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या सोहळय़ास मंत्री उदय सामंत आणि रवींद्र चव्हाण हेदेखील उपस्थित राहणार असून त्यांचाही या वेळी सत्कार करण्यात येईल.

या सोहळय़ात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकट मुलाखत पत्रकार डॉ. उदय निरगुडकर हे घेणार आहेत. तसेच मुख्यमंत्र्यांवरील गौरवग्रंथाचेही प्रकाशन या वेळी करण्यात येणार आहे. कार्यक्रमापूर्वी शिंदे यांच्या नितीन कंपनी येथील निवासस्थानापासून कार्यक्रमस्थळापर्यंत त्यांच्या मिरवणुकीचेही आयोजन करण्यात येणार आहे. प्रा. अशोक बागवे लिखित आणि संगीतकार कौशल इनामदार यांनी संगीत दिलेले गौरवगीत या वेळी सादर होणार आहे. ठाण्यातील विविध क्षेत्रांतील अभ्यासक, कार्यकर्ते, मान्यवरांनी एकनाथ शिंदे यांच्यावर लिहिलेल्या लेखांचा समावेश असणारा गौरवग्रंथही या वेळी प्रकाशित करण्यात येणार आहे. तसेच सहभागी संस्थांकडून, व्यक्तींकडून शुभेच्छारूप पुस्तकभेट स्वीकारण्यात येणार असून ही पुस्तके ग्रामीण आणि आदिवासी भागातील शाळा व ग्रंथालयांना भेट दिली जाणार आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde will felicitated in thane on saturday zws
First published on: 11-08-2022 at 02:40 IST