भाईंदर :  कुरियर कंपनीचा कर्मचारी असल्याचा बहाणा करून एका वयस्कर महिलेच्या घरातून साडेतीन लाख रुपयांची लूट करण्यात आल्याची घटना मीरा रोड येथे घडली आहे.  मीरा रोडच्या गौरव व्हॅली या इमारतीच्या सहाव्या मजल्यावर राहणाऱ्या या ६५ वर्षीय महिलेच्या घरात दुपारी एक वाजण्याच्या सुमारास दोन अनोळखी तरुण कुरियर देण्याचा बहाण्याने शिरले. वयस्कर असल्याने पीडित महिला स्वत:च्या पायावर उभ्या राहू शकत नाही, त्यामुळे घरात फिरताना त्या वॉकरचा आधार घेत असतात. घरात शिरलेल्या तरुणांनी त्यांच्या हातातून वॉकर काढून घेतला आणि त्यांच्या तोंडावर चिकटपट्टी चिकटवली, शिवाय त्यांच्या हातातील मोबाइलदेखील हिसकावून घेतला. त्यानंतर चोरांनी घरातील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकंदर साडेतीन लाख रुपयांचा ऐवज लुटून नेला. जाताना चोरांनी घराचा दरवाजा बंद करून घेतला. जवळ मोबाइल नसल्याने त्यांना झालेला प्रकार कोणाला सांगताही आला नाही. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास त्यांचा मुलगा आणि सून कामावरून परतल्यानंतर त्यांना हा प्रकार समजला आणि त्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली.

Story img Loader