कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. पाऊस आला की जसे बेडूक ओरडत सुटतात तसे असंतुष्ट पुढारी असमाधानाचे नारे लावून आपल्या स्वार्थासाठी पक्षबदल करतात. आतापर्यंत कोणत्याही पक्षाच्या नगरसेवकांनी लोकांची किंवा शहर सुधारणेची चांगली कामे केलेली नाहीत. हलक्या दर्जाची कामे करून आपापले खिसे भरण्याची कामेच यांनी केली. शहराच्या बकाल अवस्थेस हे पुढारीच जबाबदार आहेत. त्यांना आता घरी बसविणे आवश्यक आहे. जे नगरसेवक सुशिक्षित, पदवीधर नाहीत, कंत्राटदार आहेत त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची हीच खरी वेळ आहे. राखीव जागेवर जर सध्याच्या नगरसेवकांनी आपल्या पत्नीला उभे केले तर त्यांना निवडून देता कामा नये. घराणेशाही थांबवायला हवी. आताच्या नगरसेवकांनी पालिका लुटली आहे. शहराची वाट लावली आहे. त्या सर्वाना धडा शिकविण्याची हीच खरी वेळ आहे. आपले खरेखुरे कल्याण व्हावे असे वाटत असेल तर योग्य व्यक्तीची निवड करणे आवश्यक आहे.