निवडणुका बुधवारी असल्याने शनिवार-रविवारी मतदारांवर अधिकाधिक प्रभाव टाकण्याच्या इराद्याने जवळपास सर्वच उमेदवारांनी प्रचार फेऱ्यांदरम्यान केलेल्या कर्णकर्कश घोषणाबाजीने नागरिक हैराण झाले होते. ‘निवडून निवडून येणार कोण, अमक्या वा तमक्याशिवाय आहेच कोण’ अशा घोषणा देणाऱ्या रिक्षा सकाळपासून अगदी प्रचाराची वेळ संपेपर्यंत प्रभागांत फेऱ्या मारत होत्या. प्रचाराच्या या नादात आपण विभागातील शांततेचा भंग करतोय, याचे भानही उमेदवारांना राहिले नसल्याचे प्रचाराच्या निमित्ताने स्पष्ट झाले.
काही प्रभागांचा अपवाद वगळता शहरातील बहुतेक प्रभागात बहुरंगी लढती होत आहेत. त्यात सर्वच उमेदवारांनी प्रचारात आपण कुठेही कमी पडतोय असे दिसू नये म्हणून सतत मतदारांसमोर राहण्याचा आटापिटा चालविला आहे. त्यासाठी ठिकठिकाणी पोस्टर्स आणि बॅनर्स लावण्यात आलेले आहेत. जवळपास सर्वच उमेदवारांनी मतदारांच्या घरी जाऊन दोन-तीनदा व्यक्तिगत गाठीभेटी घेतल्या आहेत. मात्र एवढय़ावरच समाधान न मानता दररोज प्रचार फेऱ्या काढून प्रभागात उमेदवार शक्तिप्रदर्शन करीत आहेत.
त्यासाठी दररोज पाठीराख्यांची संख्या वाढवली जात आहे. नाशिक ढोलच्या कर्णकर्कश तालावर उमेदवाराच्या नावाचा जयघोष मतदारांच्या कानावर अक्षरश: आदळला जात आहे. एरवी दुपारच्या वेळी सहसा प्रचाराच्या घोषणा देऊ नयेत असा एक संकेत आहे. मात्र यंदा तो संकेतही उतावळे उमेदवार आणि त्यांच्या उत्साही पाठीराख्यांनी धुळीस मिळविला आहे.
अभूतपूर्व वाहतूक कोंडी
शहरातील अंतर्गत रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. त्या अरुंद रस्त्यांवरून सध्या दररोज संध्याकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत प्रचारफेऱ्या काढल्या जात असल्याने अभूतपूर्व वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. परिणामी संध्याकाळी नागरिकांना घरातून बाहेर पडणे मुश्कील झाले आहे.
घोषणाबाजीचा हा गोंधळ कमी पडतो म्हणून की काय एखाद्या मोठय़ा नेत्याच्या स्वागताप्रीत्यर्थ कार्यकर्त्यांकडून यथेच्छ फटाके फोडले जात आहेत. विशेष म्हणजे आपल्या असल्या वर्तनाने आपण नागरिकांना त्रास देतोय, याची किंचितशी जाणीवही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत नाही. आधीच वाढता उष्मा, पाणीटंचाई यामुळे नागरिक हैराण आहेत. त्यात आता निवडणूक प्रचाराची भर पडली आहे. त्यामुळे ‘निवडणूक नको पण प्रचार आवरा’ असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली.
संग्रहित लेख, दिनांक 21st Apr 2015 रोजी प्रकाशित
घोषणाबाजीच्या अतिरेकाने शांतताभंग
निवडणुका बुधवारी असल्याने शनिवार-रविवारी मतदारांवर अधिकाधिक प्रभाव टाकण्याच्या इराद्याने जवळपास सर्वच उमेदवारांनी प्रचार फेऱ्यांदरम्यान केलेल्या कर्णकर्कश घोषणाबाजीने नागरिक हैराण झाले होते.
First published on: 21-04-2015 at 12:11 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Election campaigning high sound broken the silence of area