दोन महिन्यांत आठ नगरसेवकांची पक्षाला सोडचिठ्ठी

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकांची रणधुमाळी जवळ येऊ लागताच भाजपचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या डोंबिवलीत पक्षाला खिंडार पडू लागले आहे. डोंबिवली भाजपचा बालेकिल्ला ओळखला जातो. येथील एकगठ्ठा  मते भाजपची ताकद मानली जाते. आमदार रवींद्र चव्हाण यांचा वरचष्मा राहिलेल्या या विभागातून भाजपचे नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करू लागले असून गुरुवारी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत डोंबिवलीतील तुकारामनगर भागाचे माजी नगरसेवक नितीन मटय़ा पाटील, त्यांची पत्नी    माजी नगरसेविका रंजना पाटील, काँग्रेसचे माजी नगरसेवक रवी मटय़ा पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला. डोंबिवली पश्चिमेतील भाजप माजी नगरसेवक रणजित जोशी, त्यांची पत्नी माजी नगरसेविका वृषाली जोशी यांनीही शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगितले.

दोन महिन्यात भाजपमधून आठ नगरसेवक जण शिवसेना, राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत. पाच वर्षांपूर्वी रवींद्र चव्हाण यांच्याकडे मंत्रीपद असताना राज्यातील सत्तेचा पुरेपूर वापर करत भाजपने इतर पक्षातील नगरसेवकांना गळाला लावण्याचे सत्र सुरू केले होते. यावेळी भाजपमध्ये गळती सुरू असताना स्थानिक आमदार चव्हाण राजकीय वर्तुळात दिसेनासे झाल्याची चर्चा रंगली आहे. भाजपचा बालेकिल्ला फोडण्यासाठी शिवसेनेने प्रभाग रद्द तर इतर प्रभागांना जोडण्याची खेळी केली आहे, असा आरोप भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहे.

गळती सुरूच

दोन महिन्यांपूर्वी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मलबार येथील बंगल्यावर भाजप माजी नगरसेवक महेश पाटील, सायली विचारे, डॉ. सुनीता पाटील यांनी, त्यानंतर कल्याण पूर्वेतील भाजप नगरसेवक विशाल पावशे यांनी सेनेत प्रवेश केला. भाजप समर्थक अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची भेट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाचे संकेत दिले आहेत. गुरुवारी भाजप माजी नगरसेवक नितीन पाटील, त्यांच्या पत्नी रंजना पाटील, काँग्रेसचे माजी नगरसेवक रवी मटय़ा पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला. रवी पाटील आणि नितीन पाटील यांनी डोंबिवली पूर्वेतील आयरे गाव तसेच तुकाराम नगर प्रभागांचे प्रतिनिधीत्व केले आहे.

भाजपमध्ये कोणीही नाराज नाही. कार्यकर्त्यांच्या नियमित बैठका सुरू आहेत. नाराज मंडळींच्या पक्षश्रेष्ठींबरोबर बैठका झाल्या. त्यांचे उमेदवारीचे आश्वासन दिले. सेनेने आमचे प्रभाग फोडले आहेत त्यामुळे आम्ही तिकडे चाललो. भाजपवर आम्ही नाराज नाहीत, असे जाणाऱ्यांचे म्हणणे आहे. 

– शशिकांत कांबळे, जिल्हाध्यक्ष कल्याण जिल्हा, भाजप