ठाणे जिल्ह्य़ातील विविध ठिकाणांहून प्राप्त झालेल्या मतदानयंत्राचे सोमवारी ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांच्या उपस्थितीत वितरण करण्यात आले.
ठाणे जिल्ह्य़ात ६ हजार ६२१ मतदारकेंद्रे आहेत. या केंद्रांना निवडणुकीच्या काळात मतदान यंत्रे वाटप करण्यासाठी एक विशेष पद्धत वापरली जाते. या पद्धतीमध्ये निवडणूक आयोगातर्फे एका सॉफ्टवेअरचा वापर करण्यात येतो. त्या सॉफ्टवेअरमध्ये निवडणूक यंत्राचा क्रमांक असतो. त्याच्या माध्यमातून आलेल्या क्रमांकानुसार मतदान यंत्रांचे वाटप करण्यात येते. या प्रक्रियेनुसार मतदान यंत्रांची मतदारसंघनिहाय सरमिसळ सोमवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. संगणकीय सॉफ्टवेअरच्या माध्यमातून केल्या गेलेल्या या प्रक्रियेनुसार तुर्भे येथील स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आलेल्या मतदान यंत्रांचे विधानसभा मतदारसंघनिहाय वितरण केले जाणार आहे.
तसेच सरमिसळ प्रक्रियेचा दुसरा टप्पा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर होणार असून त्याद्वारे मतदान यंत्रांचे मतदान केंद्रनिहाय वितरण केले जाईल, असे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले. या वेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी अपर्णा सोमाणी, उपजिल्हाधिकारी मनोज गोहाड, ईव्हीएम व्यवस्थापन समितीचे नोडल अधिकारी संदीप माने यांच्यासह राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.