कल्याण- पावसाळ्यात कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत उद्भवणाऱ्या परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासनाने डोंबिवली, कल्याण, टिटवाळा ते २७ गाव परिसरात आपत्कालीन यंत्रणा सज्ज केली आहे. पुराची परिस्थिती उद्भवली तर रहिवाशांना पूर्वसूचना देणारी सार्वजनिक संदेश यंत्रणा खाडी किनारी आणि शहराच्या विविध भागात बसविण्यात आली आहे, अशी माहिता पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.
डोंबिवली, कल्याण शहरांचा ११ किलोमीटरचा परिसर उल्हास खाडी भागात येतो. कल्याणमध्ये दुर्गाडी, गणेशघाट, बाजारपेठ, गोविंदवाडी, मोहिली, आंबिवली, डोंबिवलीत मोठागाव, देवीचापाडा, गरीबाचापाडा, कुंभारखाणपाडा भागात महापुराचे पाणी शिरते. पूरप्रवण क्षेत्रात स्मार्ट कल्याण डोंबिवली कॉर्पोरेशनतर्फे १० ठिकाणी खाडीची पाण्याची पातळी वाढली तर पुराची पूर्वसूचना देणारे दूरसंवेदन सयंत्र बसविण्यात आली आहेत. दूरसंवेदन यंत्रणेव्दारे पाण्याची पातळी वाढत असल्याचे लक्षात आल्यास त्या भागातील रहिवाशांचे संक्रमण शिबिरात तातडीने स्थलांतर केले जाईल, असे आयुक्त सूर्यवंशी यांनी सांगितले.
पालिका मुख्यालय, पोलीस उपायुक्त कार्यालय यांच्या कार्यालयातील दूरसंवेदन यंत्रणेतून शहरांमधील पाऊस परिस्थितीवर लक्ष ठेवले जाईल. त्याप्रमाणे उपाययोजना केल्या जाणार आहेत, असे आयुक्तांनी सांगितले.
२३५ धोकादायक इमारती
कल्याण डोंबिवलीत एकूण २३५ धोकादायक इमारती आहेत. गेल्या वर्षात १३८ इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या. उर्वरित ७६ धोकादायक इमारतींमध्ये रहिवासी राहतात. काही इमारतींची प्रकरणे न्यायालयात, काही प्रकरणांमध्ये मालक, भाडेकरू यांच्यात वाद आहेत. अशा इमारतींवर कारवाई करता येत नसल्याचे आयुक्तांनी सांगितले. धोकादायक इमारतीमधील रहिवाशांना इमारती खाली करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. पोलीस, महसूल विभागाला या विषयीची माहिती देण्यात आली आहे, असे आयुक्तांनी सांगितले.
खबरदारीचे उपाय
नाले, गटारे तुंबणार नाहीत. पावसात झाडे उन्मळून पडली तर महावितरण अधिकारी, पालिका कर्मचाऱ्यांनी एकत्र करावयाच्या उपाययोजना याविषयी खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लहान, मोठ्या नाल्यांची सफाई करण्यात आली आहे. सखल भागात अनेक ठिकाणी पाणी तुंबते. त्या पाण्याचा निचरा तात्काळ होईल यासाठी तेथे उपसा पंप बसविण्यात आले आहेत. अग्निशमन यंत्रणेला सर्व सुविधा देण्यात आल्या आहेत. जीवरक्षकांची फौज सज्ज करण्यात आली आहे, असे डाॅ. सूर्यवंशी यांनी सांगितले. दुर्गाडी किनारी ३०० हून अधिक म्हशींचे गोठे आहेत. गोठे मालकांना पूर परिस्थिती निर्माण झाली तर करावयाच्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली आहे. संक्रमण शिबिरे, अन्नाची पाकिटे वाटप यंत्रणा उभी करण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर प्रत्येकावर जबाबदारी वाटप करून देण्यात आली आहे. येत्या पावसाळी परिस्थितीवर आपण मात करू, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला.
आपत्कालीन बैठकीला प्रांत अभिजित भांडे पाटील, साहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील, एमएमआरडीचे कार्यकारी अभियंता अरविंद ढाबे, महावितरणचे कार्यकारी अभियंता दिगंबर राठोड, नरेंद्र ढवड, एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता रमेश पाटील, रेल्वे, पाटबंधारे, एमएसआरडीसीचे अधिकारी, अतिरिक्त आयुक्त सुनील पवार उपस्थित होते.
