महापालिकेच्या पर्यावरण अहवालात स्पष्ट इशारा

ठाणे शहराला प्राणवायूचा अखंड पुरवठा करणारे येऊरमधील जंगल आणि खाडीच्या पर्यावरणासाठी महत्त्वाचे मानल्या गेलेल्या तिवरांच्या पट्टय़ांना मानवी अतिक्रमणांमुळे गंभीर धोका निर्माण झाल्याचा निष्कर्ष ठाणे महापालिकेने काढला आहे. खाडीकिनारी होत असलेल्या तिवरांच्या जंगलांचा नाश आणि येऊरच्या टेकडय़ांवरील जंगल भागात होणारे सततचे अतिक्रमण चिंतेची बाब असल्याचा कबुलीवजा इशारा महापालिकेच्या पर्यावरण अहवालात देण्यात आला आहे.
ठाणे महापालिकेच्या यंदाच्या पर्यावरण अहवालात शहरातील पर्यावरणाच्या ऱ्हासासाठी अतिक्रमणे जबाबदार असल्याकडे थेट बोट दाखवण्यात आले आहे. उल्हास नदीच्या काठाने ठाण्यात खारफुटी वनस्पतीचा पट्टा आहे. काही ठिकाणी रुंद तर काही ठिकाणी अरुंद असलेल्या या पट्टय़ात गेल्या काही वर्षांत झपाटय़ाने घट झाल्याचे धक्कादायक निरीक्षण या अहवालात नोंदविण्यात आले आहे. मुंब्रा, दिवा स्थानकांच्या पट्टय़ात रुंद असलेला खारफुटीचा पट्टाही कमी झाला आहे. मानवीय कृतींमुळे तिवरांच्या जंगलांना गंभीर धोका निर्माण झाला असून इंधनसाठी तसे मत्स्यसंवर्धनासाठी या जंगलांची कापणी नित्यनेमाने सुरू असल्याची कबुली या अहवालात देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, रस्ते, पूल बांधण्यासाठी खाडीच्या दलदलीच्या भागाचे पुनप्रापण करणे हेसुद्धा खारफुटीच्या नाशाचे एक कारण असून बांधकामे आणि विकासकामांमुळे निर्माण होणाऱ्या घनकचऱ्याने खारफुटीचे सर्वाधिक नुकसान केल्याचे या अहवालात म्हटले आहे.
येऊरच्या टेकडय़ांवरील जंगल भागात तसेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या काही भागात होणारे सततचे अतिक्रमण हीदेखील चिंतेची बाब असल्याचे अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. येऊरमध्ये होणाऱ्या जंगलतोडीच्या अनेक तक्रारी यापूर्वी पुढे आल्या असताना महापालिकेच्या अहवालात हे अतिक्रमण सतत सुरू असल्याचे धक्कादायक निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.

पर्यावरणप्रेमींचा स्वप्नभंग
’ठाणे खाडीला जल अभयारण्याचा दर्जा देण्यास राज्य सरकारच्या वन विभागाने मध्यंतरी अनुकूलता दर्शवली होती. त्यामुळे खाडीचे संवर्धन आणि इथल्या जैवविविधतेचे रक्षण होईल अशी स्वप्ने सातत्याने रंगवली जात असली तरी प्रत्यक्षात खाडी पर्यावरणाची वेगाने नासाडी होत असल्याचे चित्र महापालिकेच्या पर्यावरण अहवालामुळे स्पष्ट झाले आहे.
’लाखो लिटर्स सांडपाणी, शेकडो टन कचरा बेधडक खाडीच्या पोटात ढकलला जात असल्याचे पर्यावरणतज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे पाण्याची क्षारता कमी झाली असून गाळही प्रचंड प्रमाणात वाढला. वाढत्या प्रदूषणामुळे पाण्यात विरघळणाऱ्या ऑक्सिजनचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटल्याने खाडीतील सजीवसृष्टी धोक्यात आल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.