उल्हासनगरः उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी पदभार स्विकारल्यापासून विविध विभागांच्या कारभाराची झाडाझडती सुरू केली आहे. नुकतीच आयुक्त आव्हाळे यांनी पालिकेच्या शाळांना भेट दिली. या भेटीत शाळा क्रमांक ८, २९ आणि २३ विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या शैक्षणिक गुतवत्ता तपासली. यावेळी विद्यार्थ्यांच्या वाचन कौशल्य चाचणीत त्रुटी असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी शाळा क्रमांक ८च्या एका शिक्षिकेला कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. या कारवाईमुळे शिक्षण विभाग आणि शिक्षकांचे धाबे दणाणले आहे.

उल्हासनगर महानगरपालिकेच्या प्रशासक तथा आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी महापालिकेच्या अखत्यारितील शाळांचा नुकताच पाहणी दौरा केला. तत्कालीन आयुक्त विकास ढाकणे यांनी सुरू केलेल्या ‘आदर्श शाळा’ उपक्रमाला पुढे चालना देण्यासाठी त्यांनी निवडलेल्या शाळांना भेट देऊन आयुक्तांनी वस्तुस्थितीची माहिती घेतली. या दौऱ्यात शाळेच्या बांधकामातील विविध त्रुटींवर लक्ष केंद्रित करून बांधकाम आणि विद्युत अभियंत्यांना सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्याचवेळी शाळा क्रमांक ८, २३ आणि २९ यांची सखोल पाहणी करण्यात आली.

पाहणीदरम्यान आयुक्तांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेची तपासणी केली. यावेळी विद्यार्थ्यांच्या वाचन कौशल्य चाचणीत काही त्रुटी असल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आले. त्यामुळे आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी शाळा क्रमांक ८ मधील एका शिक्षिकेला कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत. यापुढे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत सुधारणा न झाल्यास संबंधित शिक्षकांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. यावेळी शाळा क्रमांक ८ च्या परिसरात अनेक दिवसांपासून नियमबाह्य असलेली टपरी तत्काळ हटविण्याचे आदेश देण्यात आले. शाळेच्या अभ्यासिकेचे आणि इमारतीच्या सुरू असलेल्या बांधकामाचेही आयुक्तांनी निरीक्षण केले. आवश्यक सुधारणा सुचवत हे काम लवकरात लवकर पूर्ण करून विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. या पाहणीदरम्यान महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.