स्त्रीधन संकटात!
दिवसाला पाच मंगळसूत्रे, सोनसाखळय़ांची चोरी
खून, हत्या, बलात्कार, हिंसक हल्ले अशा गंभीर स्वरूपांच्या गुन्ह्य़ांच्या घटना घडल्या की कायदा व सुव्यवस्थेवर लगेच प्रश्न उभे केले जातात. त्यातून एखाद्या संबंधित पोलीस अधिकारी/कर्मचाऱ्यावर जबाबदारी निश्चित करून कारवाईही केली जाते. पण सध्या सर्वच शहरांत सोनसाखळी चोरीचे प्रमाण वाढत चालले आहे. हाताशी वेगवान बाइक, ती वेगाने पळवण्याची हिंमत आणि समविचारी जोडीदार या तीन गोष्टी असल्या तरी कोणीही सोनसाखळी चोरी करायला धजावू शकतो. सोनसाखळीच्या गुन्ह्य़ांना वचक घालण्यात पोलिसांना येत असलेले अपयश हा अशा चोरांची मानसिकता वाढण्यास जबाबदार आहे. पण सोनसाखळी चोरीचे प्रकार वाढत असतानाही याबद्दलची जबाबदारी निश्चित करण्याचे धारिष्टय़ मुख्य पोलीस अधिकारी किंवा राज्यकर्ते यांनी दाखवलेले नाही.
ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या शहरांमध्ये दिवसाढवळ्या सोनसाखळी चोरीच्या घटना घडू लागल्या आहेत. चोरीचा हा प्रकार नवीन नाही. पण गेल्या वर्षभरापासून चोरांनी कहर केला आहे. आता ठाणे, कळवा, कल्याण पट्टय़ात दिवसाला चार ते पाच मंगळसूत्रे, सोनसाखळ्या खेचल्या जाऊ लागल्या आहेत. गेल्या वर्षभरात हा आकडा ९७६ पर्यंत पोहोचला आहे. त्यापैकी ५५० प्रकरणांची उकल करण्यात पोलिसांना यश आले असले तरी सोनसाखळी चोरांना प्रतिबंध घालण्यात पोलीस अपयशी ठरत आहेत.
सोनसाखळी चोरांना रोखण्यासाठी पोलीस गस्ती पथके, बंदोबस्त आणि विशेष मोहिमा राबवत आहेत. पकडल्या गेलेल्या चोरांवर संघटित गुन्हेगारी (मोक्का) कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येत आहे. मात्र, तरीही सोनसाखळी चोरांचा धुमाकूळ सुरूच आहे. यामुळे घराबाहेर पडणाऱ्या महिलांना आपल्या स्त्रीधनाचे (मंगळसूत्राचे) संरक्षण कसे करायचे, असा प्रश्न पडला आहे. सोनसाखळी चोरताना महिलांवर हल्ले करण्यात येत असल्याने ही गुन्हेगारी आता वेगळ्या वळणावर येऊन पोहोचली आहे. खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी, दरोडे, घरफोडय़ा आदी गंभीर गुन्ह्य़ांपेक्षा सोनसाखळी चोरीचे गुन्हे आता अतिगंभीर वाटू लागले आहेत.
निर्जन ठिकाणी सोनसाखळ्या खेचणे तसे सोपे असते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून गर्दीच्या ठिकाणी मोटारसायकलवरून फेरफटका मारायचा आणि सावज टिपायचे असे प्रकार सर्रासपणे घडू लागले आहेत. सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्य़ात अनेक टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. त्यापैकी एखादी टोळी पोलिसांच्या हाती लागली तरी उर्वरित टोळ्यांचा उपद्रव सुरूच असतो. अनेकदा सोनसाखळी चोरीच्या घटनेविषयी नागरिक पोलिसांना माहिती देतात, पण चोरटे पोलिसांच्या हाती लागत नाही. काही वेळेस नागरिक मोटारसायकलचा क्रमांक किंवा चोरटय़ाने परिधान केलेल्या कपडय़ांचा रंग सांगतात, तरीही चोरटे सापडत नाहीत. चोरांच्या कार्यपद्धतीचा खोलवर तपास केला असता यासाठी वापरल्या जाणाऱ्या दुचाकी वाहनांवर बनावट क्रमांक असतात, असे आढळून आले आहे. सोनसाखळी चोरटे चोरी करायला जाण्यापूर्वी एकाच वेळी दोन जोडी कपडे अंगात घालतात (उदा. दोन शर्ट किंवा टी-शर्ट) आणि चोरी केल्यानंतर वरचे एकजोडी कपडे काढून ठेवतात, अशी माहिती समोर आली.
महिलांवर हल्ला करण्याच्याही घटना
सोनसाखळी चोर दिवसेंदिवस हिंसेचा मार्ग अवलंबू लागल्याचेही दिसून येत आहे. अनेकदा सोनसाखळी खेचताना महिला त्यास प्रतिकार करतात आणि चोरटय़ापासून दागिने वाचविण्याचा प्रयत्न करतात. मात्र, महिलांनी असा प्रतिकार केलाच तर त्यांच्यावर हल्ला करण्याचा किंवा रस्त्यावर त्यांना ढकलून देण्याचा मार्ग सोनसाखळी चोरांनी अवलंबिला आहे. त्यामुळे महिला जखमी झाल्याचे अनेक घटनांमधून समोर आले आहे. मोटारसायकलवरून पाठीमागून यायचे आणि महिलांच्या मानेवर जोरात थाप मारायची, पुढे दागिने खेचून पोबारा करायचा, असे प्रकार गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहेत. काही वस्त्यांमध्ये तसेच गृहसंकुलांमध्ये सोनसाखळी चोरटे दबा धरून बसतात, असेही तपासात स्पष्ट झाले आहे. महिलांनी ओळखू नये म्हणून चोरटे आता त्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकू लागले आहेत. त्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेविषयीही चिंता व्यक्त होऊ लागली आहे.
चोरांच्या पाठिराख्यांचे काय?
सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्य़ात एखाद्या चोराला अटक होते, मात्र या चोराकडून दागिने विकत घेणाऱ्या सोनाराला अटक होत नाही हे वारंवार दिसून आले आहे. मुळात चोरलेले दागिने विकत घेणारे नसतील तर या गुन्ह्य़ांना अटकाव बसू शकेल. असे असताना या गुन्ह्य़ांचा खोलवर तपास करण्याऐवजी पोलीस वरवरची मलमपट्टी करण्यात धन्यता मानत असल्याचे चित्र आहे. चोरीचे दागिने विकत घेण्याच्या व्यवसायात ठरावीक सोनार कार्यरत असून ठाणे, कल्याण, भिवंडी आणि इतर आसपासच्या शहरांत ते आढळून येतात. काही झोपडपट्टय़ांमधून अशा सोनारांनी दुकाने थाटली आहेत. एक लाखाचा दागिना असेल तर हे सोनार अध्र्या किमतीत म्हणजेच ५० हजारांत खरेदी करतात. सोनसाखळी चोरांकडून दागिने घेतल्याप्रकरणी काही सोनारांवर अटकेची कारवाई झाली आहे. मात्र, हे प्रमाण नगण्य आहे.
सोनारांची पळवाट..
एखाद्या गुन्ह्य़ात चोरलेले दागिने सोनाराकडून जप्त झाले तर तक्रारदाराला ते दागिने दाखविण्यात येतात. हे दागिने त्याचेच आहेत का, याची खातरजमा करण्यात येते. न्यायालयात आरोप सिद्ध करताना दागिने महत्त्वाचा पुरावा असतो. यामुळेच कायद्याच्या कचाटय़ात सापडू नये म्हणून सोनारांनी पळवाट शोधून काढली आहे. सोनसाखळी चोरांकडून चोरीचे दागिने घेत नाहीत तर त्या दागिन्यांची ‘लगड’ घेतात. त्यासाठी पाचशे ते हजार रुपये मोजतात. मात्र, पोलिसांच्या कारवाईची भीती असल्याने कारागीर लगडचे काम घेत नाहीत. यामुळे सोनसाखळी चोरटे आता स्वत:च सोन्याचे दागिने वितळवून लगड तयार करतात आणि सोनारांना विकतात.
सोनसाखळी चोरांची कार्यपद्धत
* सकाळी फेरफटका मारण्याची ठिकाणे, बसस्थानक, भाजी मंडई आणि निर्जनस्थळे असे सोनसाखळी चोरांचे प्रमुख अड्डे आहेत.
* मोटारसायकल चालविताना एकटय़ाला सोनसाखळी खेचणे शक्य होत नाही. त्यामुळे जोडीदार निवडला जातो.
* महिलेच्या जवळ मोटारसायकल येताच सोनसाखळी खेचण्याची जबाबदारी जोडीदारावर सोपवली जाते.
* रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेला टिपायचे, मोटारसायकलचा वेग कमी करायचा आणि संधी मिळताच पाठीमागे बसलेल्या जोडीदाराने दागिने खेचायचे आणि मोटारसायकलचा वेग वाढवत धूम ठोकायची, अशी या चोरटय़ांची काम करण्याची पद्धत आहे.
नीलेश पानमंद