ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या देखतच शहरातील बेहालीवर कठोर शब्दात भाष्य करत सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ओक यांनी ठाणे शहरात कायदे तर बदलले नाहीत ना? असा परखड सवाल उपस्थित केला. ठाण्यात वाहन चालक रस्त्याच्या उलट दिशेने गाड्या चालवू लागले आहेत. ‘आरटीओ’च्या नियमात काही बदल झाले आहेत का, शहरात काही नवीन संस्कृती उदयास आली आहे का, असे टोलेही त्यांनी लगावले. शहरात पर्यावरण वृक्ष तोड मोठ्याप्रमाणात होते, मोकळे पदपथ नाहीत. परवडणारी घरे नाहीत, तलावांच्या शहरात तलाव कुठे आहेत, ठाणे स्थानकाच्या बाहेर लोकांना चालायला जागा नाही असे एका मागोमाग एक सवाल करत न्यायामूर्ती ओक यांनी शहरातील समस्यांवर परखड भाष्य केले.

ठाणे वैभव या वृत्तपत्राच्या प्रवासावर साकारलेल्या ‘छापता-छापता’ या पुस्तकाचे तसेच काॅफीटेबल पुस्तकाचा प्रकाशन कार्यक्रम शुक्रवारी पार पडला. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश अभय ओक, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक उपस्थित होते. त्यावेळी अभय ओक यांनी ठाण्यातील समस्येविषयी मत व्यक्त केले.

मुंबई लगतचे शहर असल्याने ठाणे शहरात मागील काही वर्षांमध्ये मोठ्याप्रमाणात नागरिकरण वाढले आहे. असे असले तरी शहरातील रस्ते अरुंद आहेत. अनेक प्रकल्प रखडलेले आहेत. वाहतुक कोंडी पर्यावरणाचा ऱ्हास, लोकसंख्या वाढत असल्याने झालेली गर्दी यामुळे नागरिक त्रस्त आहेत. पाणी, वाहतुक कोंडीमुळे नव्या समस्या निर्माण झाल्या आहेत. ठाणे शहरातील या समस्यांविषयी निवृत्त न्यायाधीश अभय ओक यांनीही प्रशासनाला खडेबोल सुनावले.

ठाणे शहरात ४०-५० मजली इमारत उभ्या राहत आहेत. येथील घरे सामान्यांना न परवडणारी आहेत. सामान्य माणसाला परवडतील अशा वैद्यकीय सुविधा ठाण्यात किती उपलब्ध आहेत, सामान्य माणसाला परवडतील अशा किती शाळा ठाण्यात आहेत, शिक्षणाच्या किती सुविधा उपलब्ध आहेत, याचा विचार आपल्याला हवा असे अभय ओक म्हणाले.

घटनेच्या २१ व्या कलमाप्रमाणे प्रदूषणमुक्त वातावरणात राहण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे. ठाण्यात आपण किती नवीन उद्याने आपण बांधली, अनेक शहरांमध्ये सेंट्रल पार्क आहेत असे सेंट्रल पार्क महापालिकेने उभे केले आहे का? उद्याने उभी केली तरच आपल्याला मुक्त श्वास घेता येईल अशी सूचना अभय ओक यांनी मांडली. ठाण्यात पूर्वी २७ तलाव होते आता ते आक्रसत चालले आहेत, चालण्यासाठी पदपथ नसल्याचेही ते म्हणाले. विकास करताना तो सर्वसामावेशक असावा अशी सूचनाही त्यांनी केली.

दरम्यान, ओक यांच्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाषण केले. २५ एकर जागेत सेंट्रल पार्क उभे केले आहे, त्यासोबतच १४५ उद्याने आहेत ती विकसित केल्याचा दावा शिंदे यांनी त्यांच्या भाषणात केला. तसेच त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना अभय ओक यांच्या सूचना नमूद करण्यासही सांगितले.