बदलापूरः शहराच्या स्वच्छतेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कंत्राटी सफाई कामगारांसाठी लवकरच “चेहराचिन्ह उपस्थिती नोंद” (Face Recognition Attendance) प्रणाली लागू करण्यात येणार आहे. यामुळे त्यांच्या उपस्थितीची काटेकोर नोंद ठेवता येणार असून कामकाज अधिक सुसूत्र आणि पारदर्शक होणार आहे. कुळगाव-बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली आहे.

अलीकडेच भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे सचिव लक्ष्मण कुडव यांनी मुख्याधिकारी मारूती गायकवाड तसेच कंत्राटदार यांच्यासमोर कंत्राटी सफाई कामगारांच्या विविध समस्यांचा पाढा मांडला. कामगारांना पगार उशिरा मिळणे, ओळखपत्र आणि पगार पावती, न देणे, कामगार विकास कार्ड, गणवेश, पावसाळी साहित्य, वार्षिक सुट्ट्या आणि निर्वाह निधी न होणे यांसारख्या अनेक तक्रारी त्यांनी स्पष्ट केल्या. तसेच, कामगारांच्या नियमित आरोग्य तपासण्या व्हाव्यात, करारानुसार विमा संरक्षण मिळावे, कंत्राटदार बदलला तरी कामगार सेवेत राहावेत, घंटागाडी कामगारांची योग्य नोंदणी व्हावी आणि “समान काम समान वेतन” धोरण लागू व्हावे, अशा मागण्या त्यांनी यावेळी केल्या.

या सर्व मागण्यांवर मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी सकारात्मक प्रतिसाद दिली. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी हे कामगार महत्त्वाचे आहेत. त्यामुळे त्यांना त्यांच्या हक्काच्या सुविधा मिळायलाच हव्यात. नगरपालिका यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी बोलतना दिले. तसेच लवकरच होणाऱ्या नव्या करारामध्ये अनेक महत्वाचे बदल केले जातील. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे चेहराचिन्ह उपस्थिती नोंद (Face Recognition Attendance) प्रणालीचा अवलंब हा असेल, असेही गायकवाड यांनी सांगितले.

फेस रिकग्नेशन अटेंडन्स प्रणाली कशी असेल?

शहराच्या पूर्व व पश्चिम भागात दोन स्वतंत्र हजेरी शेड उभारले जाणार आहेत. या शेडमध्ये यंत्रणा बसवून सफाई कामगारांना दररोज हजेरी द्यावी लागेल. त्यांची उपस्थिती थेट नगरपालिकेच्या ऑनलाइन प्रणालीशी जोडली जाईल. कोणता कामगार कोणत्या वेळेला कामावर आला व किती वाजता गेला, याची अचूक नोंद होईल. कोणत्या ठेकेदाराचे किती आणि कोणते कामगार प्रत्यक्षात कामावर आहेत, हे स्पष्ट दिसून येईल. कामकाज अधिक पारदर्शक आणि शिस्तबद्ध होईल. गैरहजेरी व अन्य अनियमितता त्वरित लक्षात येईल.

फायदा काय

सफाई कामगारांविषयी अनेकदा गैरव्यवहार, पगार उशिरा देणे, किमान वेतन न देणे अशा तक्रारी येत असतात. या पार्श्वभूमीवर चेहराचिन्ह उपस्थिती नोंद प्रणाली हा मोठा बदल ठरणार आहे. या माध्यमातून नगरपालिका प्रशासनाला स्वच्छतेची कामे प्रभावीपणे राबवता येतील, तसेच कामगारांना न्यायही मिळेल.