इटर्निटी संकुल, तीनहात नाका, ठाणे (प.)

ठाणे स्थानकापासून वाहनाने अवघ्या दहा मिनिटांच्या अंतरावर तीनहात नाका येथील इटर्निटी गृहसंकुल मध्यवर्ती ठाण्याचे एक भूषण आहे. साडेचार एकरावरील या संकुलात १२०० जण राहतात. उच्च मध्यमवर्गीयांच्या या संकुलात सुप्रसिद्ध लेखक, कलाकार, खेळाडू, अधिकारी राहतात. वर्षभर येथे निरनिराळे सांस्कृतिक कार्यक्रम होतात.

ठाण्यातील तीनहात नाका येथील इटर्निटी संकुलात प्रवेश करताच उंच इमारतींबरोबरच खेळाचे मोठे मैदान, हिरवळ असणारे उद्यान स्वागत करते. या संकुलात १४ मजल्यांचे दोन आणि १९ मजल्यांचा एक टॉवर आहे. याशिवाय चार इमारती प्रत्येकी सात मजल्याच्या आहेत. सर्व मिळून इथे एकूण २८८ सदनिका आहेत. १२ वर्षांपूर्वी ही वसाहत उभारण्यात आली. इथे विविध धार्मिक तसेच राष्ट्रीय सण मोठय़ा उत्साहाने साजरे केले जातात. संकुलाच्या मधोमध खेळाचे मैदान, जॉिगग ट्रॅक, तरण तलाव, जिमखाना इत्यादी सुविधा आहेत. येथील जॉगिंग ट्रॅकवरून दोन फेऱ्या मारल्या की एक किलोमीटरचे अंतर कापता येते. इतकी प्रशस्त जागा असल्याने रहिवाशांना प्रभातफेरीसाठी बाहेर जाण्याची गरजच वाटत नाही. इथे पेरु, आंबा, नारळ, निंब अशी शेकडो फळझाडे आणि औषधी वनस्पती आहेत. निरनिराळी फुलझाडे आहेत. त्यामुळे इथे सकाळ-संध्याकाळ पक्ष्यांचा किलबिलाट ऐकता येतो. संकुलाचे अध्यक्ष चंद्रकांत केदारी, सचिव सुभाष मल्होत्रा, खजिनदार माधुरी जोशी, सदस्य मंदार बोरकर, अनिता यशोध, अजित बुराड, संजय गंब्रे, चंद्रशेखर दीक्षित, वसंत बाविस्कर, राजन फणसे, संतोष शिंदे, जयंत गबाळे, स्मिता देवधर, विवेक महाजन अशा १४ जणांची समिती संकुलाचे व्यवस्थापन पाहते. त्यांना नंदकुमार दीक्षित, लेखिका माधुरी ताम्हाणे आणि इतरांचे नेहमीच मार्गदर्शन मिळत असते. एका अर्थाने महामार्गालगत असलेले इटर्निटी म्हणजे जुन्या-नव्या ठाण्याचा दुवा आहे.

सुखसुविधांचे संकुल

साडेचार एकरामध्ये पसरलेल्या या संकुलात खेळाची तीन मैदाने आहेत. या मैदानात संकुलातील सर्व मुले खेळण्यासाठी येतात. त्यामुळे मैदानी खेळ खेळण्यास मुलांना प्रोत्साहन मिळते. संकुलात तरणतलावही आहे. रहिवाशांना ठरावीक वेळेत तो उपलब्ध करून दिला जातो. तसेच व्यायामासाठी सुसज्ज जिमखानाही आहे. सकाळी सहा वाजल्यापासून येथे व्यायामासाठी तरुण जमतात. जॉगिंग ट्रॅकवर पहाटेपासूनच नागरिकांची पावले वळतात. सुरक्षितता हे या संकुलाचे खास वैशिष्टय़ आहे. त्यामुळे संकुलातील ज्येष्ठ नागरिकांमध्ये रात्री १२ ते १ वाजेपर्यंत गप्पांचा फड रंगतो.

उपक्रमाचे संकुल

या संकुलात साधारण महिन्यातून दोन उपक्रम राबविले जातात. त्यात आदिवासी मुलांना कपडे देणे, संकुलातील सेवकांसाठी आरोग्य शिबीर तसेच आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक विषयांवरही परिसंवाद घेण्यात येतात. त्यासाठी तज्ज्ञांना पाचारण केले जाते. ऊर्जा फाउंडेशनच्या माध्यमातून संकुलातील प्लास्टिकच्या पिशव्या दर महिन्याला नेल्या जातात.  अलीकडेच ठाणे पोलिसांचा सायबर गुन्ह्य़ांविषयी जनजागृती आणि मार्गदर्शन करणारा कार्यक्रम संकुलात झाला. इथे एक वाचनालयही आहे. ठाण्यात कुसुमाग्रज प्रतिष्ठान देण्यात आलेल्या७० ग्रंथपेटय़ा आहेत. त्यातील दर महिन्याला एक पेटी इटर्निटीमध्ये असते. वाचकांना चार महिने पुस्तक घरी ठेवण्याची मुभा आहे, असे वाचनालयाचे व्यवस्थापन पाहणारे जोगळेकर यांनी सांगितले.

उत्सवांचा उत्साह

मुलांवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून इथे विविध सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात. दिवाळी पहाटेला संकुलाचा संपूर्ण परिसर दिव्यांच्या प्रकाशाने उजळून टाकण्यात येतो.  विविध स्पर्धा, खेळ, मनोरंजनपर कार्यक्रम आयोजित केले जातात. पाण्याचा अपव्यय टाळून होळी खेळली जाते. दहीहंडी हा सणही येथे उत्साहात साजरा करण्यात येतो.  तसेच नवरात्रोत्सवातही नऊ दिवस संकुलाच्या आवारात दांडिया खेळला जातो.

चोख सुरक्षाव्यवस्था

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संपूर्ण संकुलात तब्बल ४० सुरक्षा रक्षक आहेत. तसेच ४५ सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. लिफ्ट, प्रवेशद्वार, वाहनतळ या सर्व ठिकाणीे सीसीटीव्हीची नजर आणि मोठय़ा प्रमाणात सुरक्षा रक्षक त्यामुळे चोरटय़ांपासून संकुल सुरक्षित आहे. याशिवाय ‘इटर्निटी हेल्पलाइन’ नावाने एक मदतकेंद्रही उभारण्यात आले आहे.  ‘माय इटर्निटी’ नावाचा पाच मिनिटांचा लघुपट बनविण्यात आला आहे.