आणखी आरोपींना अटक होण्याची शक्यता

मीरारोड येथील बोगस कॉल सेंटरप्रकरणातील काही आरोपी गुजरातच्या अहमदाबादमध्ये असल्याची ठोस माहिती ठाणे पोलिसांच्या हाती लागली आहे. या आरोपींच्या शोधासाठी ठाणे गुन्हे शाखेचे एक पथक बुधवारी अहमदाबादला रवाना झाले आहे.

मीरारोड येथील बोगस कॉल सेंटरप्रकरणात आतापर्यंत ७४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या आरोपींच्या तपासादरम्यान या प्रकरणात सहभागी असलेले काही आरोपी गुजरात राज्यातील अहमदाबादमध्ये असल्याची ठोस माहिती ठाणे पोलिसांच्या हाती आली आहे. या आरोपींचा बोगस कॉल सेंटर चालविण्याच्या प्रकरणात प्रत्यक्ष सहभाग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे या आरोपींचा माग काढण्यासाठी ठाणे गुन्हे शाखेचे एक पथक बुधवारी अहमदाबादला रवाना झाले आहे, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

मीरारोड येथील बोगस कॉल सेंटरमध्ये आíथक गुंतवणूक केल्याच्या आरोपावरून अटकेत असलेल्या जगदीश कनानी हा बोरिवली तसेच मालाड भागात अशाचप्रकारचे दोन कॉल सेंटर चालवित असल्याचे तपासात समोर आले आहे.

या प्रकरणातील आणखी महत्वाची माहिती मिळविण्यासाठी पोलिसांची पथके त्याच्याकडे कसून चौकशी करीत आहेत. परंतु या तपासात तो पोलिसांना काहीच सहकार्य करीत नसल्याचे समोर आले आहे. असे असले तरी बोगस कॉल सेंटर चालविण्याचे काम हाच करीत होता, अशी माहिती देणारे अनेक साक्षीदार पुढे आले आहेत.