कॅफे सेल्फी, आग्रा रोड, कल्याण (प.)
अस्सल महाराष्ट्रीयखाद्यपदार्थामध्ये वडापावचा उल्लेख प्राधान्याने करावा लागेल. सध्याच्या धावपळीच्या युगात सहज कुठेही आणि कधीही उपलब्ध असणारा हा पोटभरू पदार्थ आता केवळ भूक भागविणे इतक्या प्राथमिक उपयोगापुरता मर्यादित राहिलेला नाही. दर पाच मैलावर जशी भाषा बदलते, तसा वडापावचाही अवतार बदललेला असतो. भाजीची चव, त्यासोबत दिली जाणारी विशिष्ट प्रकारची चटणी यामुळे आपापल्या वडापावला वेगळी ओळख देण्याचा यशस्वी प्रयत्न अनेकांनी केला आहे.
कल्याणच्या ‘एम के रोडजवळील कॅफे सेल्फी या कॉर्नरच्या रुची मोरे’ यांनीही अशाच पद्धतीने वडापावमधील ‘चीज वडा-पाव’ हा नवा प्रकार खवय्यांना उपलब्ध करून दिला आहे. मुंबई परिसरात राहणाऱ्या लोकांचे आयुष्य हे घडय़ाळ्याच्या काटय़ावर अवलंबून असते. अनेकदा व्यस्त जीवनशैलीत खाण्याकडे दुर्लक्ष होते. अशा वेळी काही लोकांचे पाय वडापावच्या गाडीकडे वळतात. रुची मोरे यांनी नेहमीच्या वडापावमध्ये चीज मिसळवून वेगळी गंमत आणली आहे. बाहेर खातानाही काही तरी वेगळे हवे, असा लोकांचा आग्रह असतो. त्यातही तरुणमंडळी चीज आणि मियोनिझ सॉस पसंत करू लागले आहेत. त्यामुळे रुची मोरे यांनी पारंपरिक वडापावला चीजची जोड दिली आहे.
या वडय़ामध्ये स्वत: घरगुती पद्धतीने बनवलेला अस्सल महाराष्ट्रीय ठेचा भाजीमध्ये मिसळवून कुरकुरीत वडा तयार करतो. त्यामुळे या गरम वडय़ाची बात काही औरच असते. तसेच पावाच्या आतील बाजूस घरगुती पद्धतीने बनवलेला एक चटकदार सॉस लावून त्यात हा वडा ठेवला जातो.
त्यानंतर त्याच्यावर अगदी लहानांपासून ते अगदी आजी-आजोबांपर्यंत सर्वाना आवडणाऱ्या ‘चीज ’ या पदार्थाचा बारीक कीस करून अगदी भरीवपणे त्यावर टाकला जातो. साधारणत: दिवसाला त्यांना ७ ते ८ किलो इतके चीज वापरले जाते. त्यानंतर त्याच्यावर ‘मियोनिझ सॉस’ही टाकला जातो. त्यामुळे चीज आणि मियोनिझ यांची एकत्रितपणे आलेली चव खवय्यांना हवीहवीशी वाटणारी असते.

फ्रँकीज्, औषधी सूप, आणि फालुदा
कॅफे सेल्फी हे इतर खाद्यपदार्थासाठीही प्रसिद्ध आहे. विशेषत: निरनिराळ्या स्वादांच्या फ्रँकीज् येथे मिळतात. व्हेज रोलपासून ते जैन रोल फ्रँकीज्पर्यंतचे विविध प्रकार येथे उपलब्ध आहेत. त्याचबरोबर विविध प्रकारच्या ताज्या पालेभाज्या आणि आले वापरून केलेले औषधी आणि चवदार सूप कॅफे सेल्फीमध्ये मिळते. थंडपेयांमध्ये अंजीर व किवीसारख्या निरनिराळ्या प्रकारच्या फळांपासून तयार केलेला फालुदाही उत्तम मिळतो. पुन्हा या खाऊ मैफलीचा थंडगार शेवट करणारे आइसक्रीमही येथे मिळतात.