भगवान मंडलिक

कल्याण : ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात भातशेतीचा हंगाम सुरू झाला आहे. भात रोपे उखळणी, लागवडीसाठीची दिवसाची मजुरांची मजुरी ४०० रुपये आहे. या मजुरी बरोबर दोन वेळचे भोजन आणि संध्याकाळी घरी जाताना मजुराला श्रमपरिहारासाठी आणखी बिदागी द्यावी लागते. मजूर सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत काम करतो. एवढी मोठी रक्कम मोजून शेवटी भातपीक हाती लागेल याची शक्यता नसते. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील बहुतांशी शेतकऱ्यांनी लागवडी (आवणी) पध्दतीच्या भात रोपणीकडे पाठ फिरवली आहे.

यापूर्वी गावातील कष्टकरी मजूर, आदिवासी, कातकरी समाजातील कष्टकरी वर्ग भात लागवडीच्या हंगामाच्या काळात मुबलक प्रमाणात उपलब्ध होत होता. एकत्र कुटुंब पध्दतीमुळे शेतीच्या कामासाठी एका घरातून आठ ते १० सदस्य मजुरांबरोबर शेतात काम करत होते. ३० ते ४० वर्षापूर्वी भात शेतीच्या हंगामात रोपे (आवण) उखळणी, रोपांची लागवड (आवणी) करण्यासाठी १० रुपये मजुरीपासून ते ३० रुपयांपर्यंत मजुरीसाठी कष्टकरी शेतकऱ्यांना मिळायचे.

हेही वाचा >>> डोंबिवलीत कोपरमध्ये रखवालदाराला दारुड्याकडून ठार मारण्याचा प्रयत्न

बदलत्या परिस्थितीप्रमाणे मजुरी वाढत गेली. शासनाच्या अनेक योजना कष्टकरी, असंघटित वर्गासाठी आल्या. दुर्बल घटकासाठी शिधावाटप दुकानातून मोफत धान्य मिळू लागले. पंतप्रधान किसान योजनेतून योजनेतून कष्टकरी वर्गाला वर्षाला सहा हजार रुपये थेट बँक खात्यात मिळत आहेत. राज्य शासनाच्या नमो महासन्मान योजनेतून सहा हजार रुपये मिळणार आहेत. कष्टकरी वर्ग आता सुस्थितीत आहे. नवतरुण वर्ग शेतीमध्ये उतरण्यास तयार नाही. खेड्यातील बहुतांशी सुशिक्षित वर्ग नोकरी, व्यवसाय, मुलांच्या शिक्षणासाठी तालुका, शहरी भागात स्थिरावला आहे. कष्ट हा प्रकार नामशेष होत आहे. गावातील एकत्र कुटुंबांचे विलगीकरण झाले आहे. शेतांच्या वाटण्या झाल्या आहेत. त्यामुळे प्रत्येकजण आटोपशीर शरीराला कष्ट न होता भात लागवडीचे झटपट काम होईल यादृष्टीने प्रयत्न करत आहे.

हेही वाचा >>> Maharashtra News Live : पुढील तीन-चार दिवस कोकणासाठी धोक्याचे, हवामान विभागाचा अंदाज

गाव परिसरातील माळरान धनदांडग्यांनी विकत घेतले आहे. गावातील गाईगुरांना चरण्यास जागा नाही. गावातील पशुधन गायब झाले आहे. नांगर, बैलगाडी हे प्रकार नवीन तंत्रज्ञानामुळे बाद झाले आहेत. आता शेतकरी जूनमध्ये भाताची रोपाची पेरणी करतो. त्यानंतर दर तासाला तीन ते चार हजार रुपये मोजून ट्रॅक्टरने जमीन उखळून घेतो. भाताची रोपे तयार झाली की रोपे उखळणीसाठी वाढीव मजुरी देऊन मजुरांकडून भात लागवड करून घेतो. या कामासाठी शेतकऱ्याला १५ ते २० हजार रुपये खर्च येतो. आदिवासी दुर्गम भागात काही शेतकरी पहाटेच्या वेळेत स्वताचे वाहन, टेम्पो घेऊन जातात.

हेही वाचा >>> मुंबईसह ठाण्यात मुसळधार पाऊस

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाडीवरील मजुरांना टेम्पोत घेऊन येतात. त्यांचे भोजन, मजुरीची सोय करतात. त्यांना पुन्हा संध्याकाळी घरी नेऊन सोडतात. त्यामुळे काही शेतकऱ्यांची पारंपारिक पध्दतीने भात लागवड होते, असे हरिश्चंद्र वरकुटे या शेतकऱ्याने सांगितले. शेतकरी माळरानावर नागली, वरई, भेंडी लागवड करायचे. तो प्रकारही वाढीव मजुरीमुळे बंद झाला. मजुरांची चणचण आणि ४०० रुपये मजुरीमुळे ठाणे जिल्हयातील बहुतांशी शेतकऱ्यांनी चिखलणी पध्दतीच्या भात लागवडीकडे पाठ फिरवली आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या ‘सगुणा राईस तंत्रज्ञान’ (एसआरटी) या कमी कष्टाच्या लागवडीकडे शेतकरी हळूहळू वळत आहे.