बाजारातील भाववाढीच्या काळातही शेतकऱ्यांच्या घरी स्वस्त तूरडाळ

ठाणे जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांकडून भात हे मुख्य पीक घेतले जात असले तरी गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात येथील शेतकऱ्यांकडून तुरीची मोठय़ा प्रमाणात लागवड करण्यात आली होती. त्याचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले असून, किरकोळ बाजारात तुरीच्या दरांनी टोक गाठले असले तरी जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांना तसेच काही वस्त्यांना स्वस्त तूर उपलब्ध झाली आहे. त्यामुळे यंदाही खरीप हंगामात जिल्हा प्रशासनाकडून मोठय़ा प्रमाणात आंतरपीक म्हणून तुरीचे उत्पन्न घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात येत आहे. तुरीतील पोषक घटकांमुळे कुपोषणावरही मात करण्यास मदत होत असते. त्यामुळे अतिरिक्त डाळीची विक्री करून त्याचा आर्थिक फायदा घेण्याचे आवाहन कृषी विभागाकडून केले जात आहे.

ठाणे जिल्ह्यात पावसाळ्यामध्ये प्रामुख्याने पारंपरिक पद्धतीने भातशेती केली जाते. त्यातून येणारे उत्पन्न अत्यंत मर्यादित स्वरूपात असते. काही शेतकरी अत्याधुनिक पद्धतीने शेती करत असले तरी केवळ भातशेतीवर अवलंबून राहणे त्यांनाही आता कठीण होऊन बसले आहे. यामुळे कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना अंतरपीक आणि इतर पिकांचे उत्पन्न घेण्यासाठी प्रोत्साहित केले जाऊ लागले आहे. गेल्या दोन वर्षांपासून ठाण्यातील शेतकऱ्यांना तूर आणि हरभरा लागवडीसाठी प्रोत्साहन देऊन त्यांना त्यासाठी आवश्यक बियाणांची उपलब्धताही करून देण्यात येत आहे. त्याचा फायदा येथील शेतकऱ्यांना होताना दिसू लागला आहे. ठाणे जिल्ह्य़ातील सुमारे ८५७ हेक्टर क्षेत्र या तूर लागवडीखाली आले असून, त्यातून प्रत्येक शेतकरी २ क्विंटल प्रति हेक्टर उत्पन्न घेऊ लागला आहे. त्यामुळे गेल्या वर्षी ठाणे जिल्ह्याचे तुरीचे उत्पन्न सुमारे १७१४ क्विंटल पेक्षाही जास्त होते. यामुळे शेतकऱ्यांना तुरीचा लाभ घेण्याबरोबरच अतिरिक्त तुरीची विक्री करून त्यातून अर्थिक फायदा मिळवण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

मुरबाडमध्ये सर्वाधिक उत्पादन

यंदाच्या वर्षी तूरडाळीचे भाव सुमारे दोनशे रुपयांपेक्षाही जास्त झाले होते. आजही ही भाववाढ कायम आहे आणि नजीकच्या काळात त्या वाढण्याची भीतीही व्यक्त होत आहे. त्यामुळे या महागाईच्या काळात शेतकऱ्यांना घरच्या घरी तूरडाळीचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. तूरडाळीतील पोषक घटकांमुळे या डाळीला मोठी मागणी असून त्यामुळे कुपोषणावर मात करणे शक्य ठरते. ठाणे जिल्ह्यातील मुरबाडमध्ये सर्वाधिक तुरीचे उत्पन्न घेण्यात आले, तर त्याखालोखाल शहापूरमध्ये तूर पिकल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक महावीर जांगटे यांनी दिली.

खाचरातील शेती आंतरपीक म्हणून उपयुक्त..

तूर लागवडीसाठी मोठी विस्तृत जागा लागत नाही. शेताच्या बांधावर या पिकाची लागवड करून भातशेती करणारे शेतकरी तुरीचे आंतरपीक घेऊ शकतात. कृषी विभागाच्या वतीने जिल्ह्यातील सुमारे ३० हजार शेतकऱ्यांना या पिकाच्या लागवडीसाठी बियाणाच्या पिशव्यांचे वाटप करण्यात आले होते. यावर्षी ही संख्या कायम राहणार असून उत्पादन वाढवण्याकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे. आंतरपीक म्हणून याची लागवड केल्यामुळे भातपिकाच्या बांधावर वाढणारी तण, गवत यांच्यावर नियंत्रण येऊन किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव रोखला जातो. त्यामुळे भाताचे पिकाचे उत्पन्न वाढण्यासही याची मदत होते, अशी माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली.

तुरीच्या लागवडी खालील क्षेत्र – ८५७ हेक्टर

तुरीचे प्रति हेक्टरी उत्पन्न – २ क्विंटल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुरीचे २०१५ चे उत्पन्न – १ हजार ७१४