अंबरनाथ: अंबरनाथ पूर्वेतील चिखलोली भागात असलेल्या अंबरनाथ नगरपालिकेच्या कचराभूमीला बुधवारी दुपारी भीषण आग लागली. या आगीमुळे शेजारच्या सर्वोदय गृहसंकुलाच्या नागरिकांना धुराचा आणि दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागला. शेजारच्या डोंगरावर लागलेली आग पसरत कचराभूमी पर्यंत गेल्याचा अंदाज स्थानिकांनी व्यक्त केला आहे. सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास ही आग आटोक्यात आली. मात्र कचराभूमी धुमसत असल्याची माहीती स्थानिक रहिवाशांनी दिली आहे.

अंबरनाथ शहराच्या पश्चिम भागात चिखलोली परिसरात अंबरनाथ नगरपालिकेची कचराभूमी आहे. काही वर्षांपूर्वी ही कचराभूमी नव्याने तयार करण्यात आलेल्या दिवाणी न्यायालयासमोर होते. बेकायदेशीरपणे येथे कचरा टाकला जात असल्याची बाब समोर आली होती. राष्ट्रीय हरित लवाद, न्यायालय प्राधिकरण, स्थानिक नागरिकांच्या रोषानंतर पालिकेने ही कचराभूमी हलवली. मात्र तीही रहिवासी क्षेत्रा शेजारीच गेल्याने स्थानिकांनी विरोध केला होता. पूर्वी या कचराभूमीला मोठी आग लागत होती. तर पावसाळ्यात येथून निघणारी दुर्गंधी स्थानिकांना मानसिक आणि शारीरिक त्रास देणारी ठरत होती.

हरित लवादाच्या आदेशानंतर येथे व्यवस्था करत दुर्गंधी दूर करण्यात आली. मात्र बुधवारी पुन्हा या कचराभूमीला अचानक आग लागली. आधी शेजारी असलेल्या डोंगराला आग लागली. मग कचराभूमीला आग लागली, अशी माहिती स्थानिक प्रकाश भामरे यांनी दिली. ही आग पुढे पसरत कचराभूमी पर्यंत गेली, असेही ते म्हणाले. यामुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते. तर दुर्गंधीही पसरली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दीडच्या सुमारास आग लागली तर अग्निशमन दल उशिरा पोहोचल्याने आग इतरत्र पसरल्याचा दावा स्थानिकांनी केला. सायंकाळी साडे सहाच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र कचराभूमीला लागलेली आग रात्रीही धुमसत होती. आग लागल्याचे नेमके कारण कळू शकले नाही. मात्र वाढलेले तापमानही कारणीभूत ठरू शकते, अशी शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली आहे.