मोठी दुर्घटना टळली; १५० जणांची सुखरूप सुटका
ठाण्यातील हरिनिवास सर्कल भागातील गिरीराज हाईट्स या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे शुक्रवारी दुपारी आग लागली. २६ मजली असलेल्या या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर विद्युत वाहिनीच्या कक्षामध्ये शॉर्ट सर्किट होऊन ही आग २६व्या मजल्यापर्यंत गेल्याचा प्राथमिक अंदाज अधिकाऱ्यांकडून वर्तविण्यात आला आहे. या इमारतीमधील १५० रहिवाशांना अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ सुखरूप बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली.
ठाणे येथील हरीनिवास भागात गिरीराज हाईट्स नावाची २६ माळ्याची इमारत आहे. या इमारतीत शुक्रवारी दुपारी शॉर्ट सर्किटमूळे आग लागली. या घटनेनंतर ठाणे महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन दलाचे ७० जवान ८ गाडय़ांसह घडनास्थळी दाखल झाले. या घटनेनंतर इमारतीची उद्वाहक यंत्रणा तातडीने बंद करण्यात आली आणि त्यांनतर अग्निशन दलाच्या पथकाने आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने इमारतीत अडकलेल्या १५० रहिवाशांना सुखरुप बाहेर काढले. उद्वाहक यंत्रणा बंद करण्यात आल्याने जेष्ठ नागरीकांना इमारतीबाहेर काढताना पथकाला तारेवरची कसरत करावी लागली.
या घटनेमूळे शहरात एकच खळबळ उडाली होती. तसेच या इमारतीच्या परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. आगीमुळे सर्वत्र पसरलेल्या धुरामुळे गुदमरण्याच्या घटना टाळण्यासाठी जवानांनकडून विशेष उपायोजना केल्या जात होत्या.
निमुळत्या जागेमुळे बचावकार्यात अडथळा
२६ माळ्याच्या इमारतीत झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे इमारतीतील उद्वाहक यंत्रणा बंद करण्यात आली. वरच्या मजल्यावर राहणाऱ्या नागरीकांना सुखरूप खाली उतरवण्यासाठी बोलवण्यात आलेल्या अग्निशमन दलाच्या गाडीला निमुळत्या रस्त्यामुळे इमारतीच्या तळापर्यंत जाणे कठीण झाले. इमारतीच्या आवाराच अडकलेल्या या गाडीमुळे घटनास्थळी दाखल झालेल्या इतर गाडय़ांना परत फिरणे कठीण झाले.
* इमारतीच्या २६ व्या मजल्यापर्यंत पोहचून नौपाडा पोलिसांनी अनेक रहिवाशांना इमारती बाहेर काढले. चौथ्या मजल्यावरील घरामध्ये अडकलेल्या रहिवासी खिडकीमधून मदतीसाठी आवाज देत होते. त्यावेळेस पोलिस निरीक्षक एस. एन. धुमाळ यांनी इमारतीच्या रंगकामासाठी लावलेल्या बांबूवरून चौथ्या मजल्यापर्यंत जाऊन त्या कुटूंबाला मदत करण्याचा प्रयत्न केला. या घरामध्ये लहान मुल होते. मात्र, लोखंडी खिडकीमुळे त्या कुटूंबाला बाहेर पडता येत नव्हते. अखेर इमारतीच्या दुसऱ्या जिन्याचा वापर करून अग्निशमन दलाचे घरात शिरले आणि त्यांनी त्या कुटूंबाला घराबाहेर काढले.