रेल्वेप्रवाशांना धुक्याचा धक्का!

धुक्याचा सर्वाधिक फटका कल्याणपलीकडच्या प्रवाशांना बसत आहे.

ठाणे ते कल्याण दरम्यान दररोज सकाळी रेल्वेमार्गावर धुके पसरल्याने गाडय़ांचा वेग मंदावला आहे.

सकाळी उपनगरी रेल्वेगाडय़ांचा वेग मंदावला; ठाणे ते कल्याणदरम्यान सर्वाधिक प्रभाव
सिग्नल बिघाड, ओव्हरहेड वायर तुटणे, रेल्वे रुळांना तडा, इंजिनबिघाड, अतिवृष्टी अशा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वर्षांचे बारा महिने रडत-रखडत चालणाऱ्या मुंबईच्या उपनगरी रेल्वे सेवेला आता दाट धुक्याचाही फटका बसू लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून थंडीचा प्रभाव जाणवू लागला असून थंडीमुळे सकाळच्या वेळेत ठाणे ते कल्याणदरम्यानच्या परिसरावर दाट धुक्याची चादर पांघरली जात आहे. याचा फटका लोकल रेल्वेच्या वाहतुकीला बसू लागला असून या पट्टय़ातून गाडय़ा सावकाश हाकाव्या लागत आहेत. गेल्या दोन आठवडय़ांपासून सकाळच्या सुमारास उपनगरी रेल्वेगाडय़ा दहा ते पंधरा मिनिटे उशिराने धावत आहेत. परिणामी उपनगरी रेल्वे सेवेचे वेळापत्रकच कोलमडल्याची परिस्थिती आहे.
वाढत्या थंडीमुळे सकाळच्या वेळेत ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा, कोपर आणि ठाकुर्ली या स्थानकांदरम्यान धुक्यांची चादर पसरलेली असते. कल्याणपलीकडच्या स्थानकांच्या परिसरात तर अगदी नऊ-दहा वाजेपर्यंत धुक्याचा प्रभाव जाणवत आहे. अशा धुक्यातून रेल्वे गाडय़ा अतिशय सावकाश पुढे न्याव्या लागत आहेत. बऱ्याचदा दाट धुक्यात पुढचे दिसेनासे झाल्यामुळे मोटरमनना गाडी थांबवून पुढचा अंदाज घ्यावा लागत आहे. त्यामुळे एकूणच रेल्वेच्या लोकलसेवेचा वेग मंदावला आहे. दुसरीकडे, पहाटे थंडी आणि दुपारी कडक ऊन यामुळे वातावरणामध्ये मोठे बदल होत असून त्यामुळे रेल्वे रूळ तडकण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे लोकल धिम्या गतीने चालवण्याची वेळ येत असल्याचे उपनगरीय रेल्वेच्या मोटरमनकडून सांगण्यात येत आहे. याचा फटका साहजिकच रेल्वे प्रवाशांना बसू लागला आहे. ‘प्रवाशांना त्रास सहन करावा लागत असला तरी, त्यांची सुरक्षा लक्षात घेऊन गाडय़ांचा वेग कमी करण्यात आला आहे. मात्र, धुके नसलेल्या भागातून गाडय़ा वेगाने नेल्या जात असल्याने विलंबाचा अवधी भरून काढण्यात येत आहे,’ असे रेल्वे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
लांब पल्ल्याच्या गाडय़ांना फटका
मुंबई, ठाण्याप्रमाणेच उत्तरेकडील राज्यांमध्येही कडाक्याची थंडी पडली असून तिकडे दाट धुक्यामुळे रेल्वेचालकांना मार्ग दिसण्यात अडचणी उभ्या राहत आहेत. त्यामुळे मुंबईकडून उत्तरेकडे जाणाऱ्या गाडय़ा रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामध्ये छत्रपती शिवाजी टर्मिनस ते वाराणसी या स्थानकांदरम्यान धावणारी महानगरी एक्स्प्रेसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. लोकमान्य टिळक टर्मिन्स राजेंद्र नगर एक्स्प्रेस, कोलकता मेल, पुष्पक एक्स्प्रेस, गोरखपुर एक्स्प्रेस या गाडय़ा मध्य रेल्वेच्या वतीने रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय लांब पल्ल्याच्या गाडय़ांना धुक्याच्या त्रासामुळे ठरलेल्या वेळापत्रकापेक्षा उशिराने धावण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

मेल, एक्स्प्रेसमधून प्रवास करू द्यावा
धुक्याचा सर्वाधिक फटका कल्याणपलीकडच्या प्रवाशांना बसत आहे. गाडय़ा धिम्या गतीने चालल्याने ठरलेल्या वेळात पोहचता येत नाही. त्यामुळे कल्याणपलीकडच्या प्रवाशांना लांब पल्ल्याच्या सगळ्याच गाडय़ांमधून प्रवास करण्याची मुभा देण्यात यावी, अशी मागणी कल्याण, कर्जत आणि कसारा प्रवासी संघटनेचे शैलेश राऊत यांनी केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Fog creating problem in railway transportation

ताज्या बातम्या