जगदीश खैरालिया, समता विचार प्रसारक संस्था
ठाणे महापालिका क्षेत्रात तब्बल २०० हून अधिक लहान-मोठय़ा झोपडपट्टय़ा आहेत. शहराच्या लोकसंख्येपैकी फार मोठा वर्ग येथे राहतो. या समाजातील आरोग्य, शिक्षण तसेच स्वच्छतेचे प्रश्न जटिल स्वरूपाचे आहेत. एका सर्वेक्षणानुसार शहरातील प्रत्येक व्यक्ती दररोज सरासरी ४५० ग्रॅम कचरा तयार करते. एवढय़ा मोठय़ा संख्येने तयार होणाऱ्या कचऱ्याचे काय करायचे हा ठाणे शहरापुढील सर्वात मोठा प्रश्न आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात स्वच्छतेसाठी एकूण दहा हजार सेवकांची आवश्यकता आहे.
प्रत्यक्षात सध्या कायमस्वरूपी २३०० आणि दोन हजार कंत्राटी कामगार आहेत. त्यात काही ठेकेदार कंत्राटी कामगारांचे शोषण करतात. त्यांना नियमानुसार वेतन देत नाहीत. प्रशासनाने त्यात लक्ष घालून कामगारांना त्यांच्या हक्काचा मोबदला मिळवून द्यायला हवा. शिवाय शहरात सुमारे पाच हजार कचरावेचक ठिकठिकाणी फिरून कचरा गोळा करण्याचे काम करतात. महापालिकेकडून कोणतेही मानधन न घेता ही मंडळी स्वच्छतेला हातभार लावत आहेत. त्यामुळे त्यांना प्रोत्साहन दिले तर शहर अधिक स्वच्छ राहण्यात मदत होऊ शकेल. चतुर्थ श्रेणी कामगारांना विश्वासात घेतले, त्यांच्या सूचनांचा आदर केला, तर ‘स्वच्छ ठाणे’ सहजसाध्य होईल.
दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे तो या वस्त्यांमधील शिक्षणाचा. येथे गळतीचे प्रमाण अतिशय जास्त आहे. प्रतिकूल परिस्थितीमुळे त्यांचे शिक्षणाकडे दुर्लक्ष होते. घरात शिक्षणाचे वातावरण नसते. आम्ही समता विचारक प्रसारक संस्थेच्या वतीने अशा परिस्थितीतही दहावी उत्तीर्ण होणाऱ्या मुलांना प्रोत्साहन म्हणून एकलव्य पुरस्कार देतो. त्यांना प्रोत्साहन द्यावे, हा यामागचा हेतू असतो. त्यांना त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीत मदतही करतो.
दर वर्षी समता संस्कार शिबीर घेऊन समाजातील विषमता दूर करण्याचा प्रयत्न करतो. गेल्या तीन वर्षांपासून आम्ही वंचितांचा रंगमंच हा उपक्रम वस्त्यांमध्ये राबवीत आहोत. ज्येष्ठ रंगकर्मी रत्नाकर मतकरी यांचे या उपक्रमासाठी सहकार्य लाभले आहे. ठाण्याला सांस्कृतिक नगरी म्हटले जाते. येथील ‘नाही रे’ वर्गातील घटकांनाही आपले कलागुण सादर करण्याची संधी मिळावी, हा यामागचा उद्देश आहे. सुरुवातीच्या काळात आम्ही राम मोहन लोहिया व्याख्यानमाला हा उपक्रम राबवीत होतो. आता आम्ही क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने निरनिराळ्या वस्त्यांमध्ये व्याख्यानमाला आयोजित करतो. जास्तीत जास्त लोकांनी ही व्याख्याने ऐकली पाहिजेत. त्यांनी स्वत: विचार करायला शिकले पाहिजे, असे आम्हाला वाटते. अशा उपक्रमांना महापालिका प्रशासन निश्चितच मदत करू शकते.