ठाणे : बँक ऑफ महाराष्ट्र या सरकारी बँकेच्या माजी कर्मचाऱ्यांना मोफत क्रेडीट कार्डची जाहीरात समाजमाध्यमावर प्रसारित करून सायबर गुन्हेगारांनी एका निवृत्त कर्मचारीची २७ लाख रुपयांना फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. सायबर गुन्हेगारांनी मुदत ठेवींच्या द्वारे कर्ज खाते उघडले. त्या कर्ज खात्यातील पैसे सायबर चोरट्यांनी स्वत:च्या खात्यांमध्ये वळविले आहेत. मुदत ठेवीच्या पावत्या आमच्याकडे असतानाही सायबर गुन्हेगारांनी ही कर्जखाती कशी उघडली असा प्रश्न फसवणूक झालेल्या प्रज्ञा जोशी आणि त्यांचे बंधू शशांक वाड यांनी केला आहे.
काही दिवसांपूर्वी फेसबुक या समाजमाध्यमावर एक जाहिरात प्रसारित झाली होती. या जाहिरातीमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र मधील निवृत्त कर्मचाऱ्यांना विशेष मोफत क्रेडीट कार्ड असा मजकूर होता. तसेच जाहिरातीत बँकेचे नाव, बोधचिन्ह होते. त्यामुळे ठाण्यात राहणाऱ्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या निवृत्त कर्मचारी प्रज्ञा जोशी यांनी त्या जाहिरातीवर क्लिक केले. पंरतु ही जाहिरात बँकेने दिली नव्हती. तर सायबर गुन्हेगारांनी दिली होती. त्यांच्या मोबाईलमधील बँकेच्या ॲपचा ताबा सायबर गुन्हेगारांनी घेतला आणि प्रज्ञा जोशी यांच्या खात्यातील २७ लाख रुपये सायबर गुन्हेगारांनी काढून घेतले.
प्रज्ञा जोशी यांच्या कुटुंबियांसोबत काही मुदत ठेवी आहेत. त्या सर्व ठेवींच्या पावत्या देखील त्यांच्याकडे आहे. असे असतानाही सायबर गुन्हेगारांनी ठेवींच्या समोर अनेक कर्जखाती उघडली. त्या कर्जखात्यांमधील पैसे सायबर गुन्हेगारांनी जोशींच्या खात्यात वळविले आणि त्यानंतर ‘आयएमपीएस’द्वारे स्वत:च्या खात्यात वळविले. हे सर्व व्यवहार रात्रीच्या वेळेत झाले आहेत.
मुदत ठेवींच्या पावत्या खातेदाराकडे असतानाही चोरट्यांनी कर्जखाती कशी तयार केली असा प्रश्न प्रज्ञा जोशी आणि वाड यांनी उपस्थित केला. ही कर्जखाती उघडताना बँकेकडून कोणतीही सूचना ठेवीदाराला का दिली नाही, खातेदाराला लघुसंदेश किंवा ई-मेल का मिळाला नाही, मुदत ठेवी कुटुंबियांसमवेत असतानाही या ठेवींच्या संयुक्त धारकांकडून कोणतीही अनुमती का घेतली नाही असे वाड म्हणाले.
या प्रकरणात काही मिनीटांत लाखो रुपये कसे वळते झाले. बँक ऑफ महाराष्ट्रची जोखीम सुरक्षा प्रणाली सतर्क का झाली नाही असेही ते म्हणाले. आयएमपीएसद्वारे एका दिवसांत पाच लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे पाठविता येत नाहीत. असे असतानाही इतक्या मोठ्या रकमांचे व्यवहार कसे झाले असेही ते म्हणाले. ठेवीदारांनी डिजीटल बँकिंगमध्ये व्यवहार, समाजमाध्यमांचा वापर करताना आणि मुख्यत: अशा बँकांमध्ये मुदत ठेवी उघडताना काळजी घ्यावी कारण या बँकांच्या अंतर्गतयंत्रणा कमकुवत असल्याचा आरोपही त्यांनी केला.