ठाणे : आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत आम्ही काम केलेली माणसे असून आम्हाला विकासाची सवय आहे. पण, मधल्या काळात सत्ता नसल्यामुळे कळव्याचा विकास रखडला आहे. पुढे सत्ता येणारच नाही, असे आमचे म्हणणे नाही. परंतु कळव्यापुढे आता वेळ नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना (शिंदे) पक्षात प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी नगरसेवक आणि ठाणे पालिकेचे विरोधी पक्ष नेते मिलींद पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. तसेच जितेंद्र आव्हाड विकास पुरुष तर, एकनाथ शिंदे महाविकास पुरुष असा उल्लेखही त्यांनी यावेळी केला.
ठाणे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, माजी नगरसेविका मनाली पाटील, माजी नगरसेवक महेश साळवी, माजी नगरसेविका मनिषा साळवी, माजी नगरसेविका व ठाणे महिला राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्याध्यक्षा सुरेखा पाटील, माजी नगरसेवक सचिन म्हात्रे यांनी भगवा झेंडा हाती घेऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केला. या प्रवेशानंतर मिलिंद पाटील यांनी पत्रकारांना संवाद साधत प्रतिक्रिया दिली. धक्कादेण्यापेक्षा एखादा माणूस समाजकारणात किंवा राजकारणात येतो, त्यावेळी त्याची अपेक्षा असते की,आपल्या प्रभागाचा विकास व्हावा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या विकासाबद्दल आम्ही काय बोलणार, त्यांनी केलेला विकास संपुर्ण महाराष्ट्राने पाहिला आहे. तो आम्हाला सांगायची गरज नाही. जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत काम केलेली आम्ही माणसे आहोत.
त्यामुळे आम्हाला विकासाची सवय आहे. परंतु मधल्या काळात सत्ता नसल्यामुळे कळव्याचा विकास रखडला होता. सत्ता येणारच नाही असे आमचे म्हणणेच नाही. पण कळव्यापुढे आता वेळ नाही, असे पाटील म्हणाले. जुन्या इमारतींचा पुनर्विकास आणि नवीन विकास आराखड्यामुळे पुनर्विकास अशक्य होईल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ४० वर्षे जुन्या इमारती आहेत. पाच वर्षात नागरिकांना इमारती रिकाम्या कराव्या लागतील. काही लोक इमारतीची दुरुस्ती करत आहे. परंतु बांधकाम स्थिरता प्रमाणपत्र तीन वर्षापेक्षा जास्त मिळत नाही. त्यामुळे येणाऱ्या भविष्याचा आता विचार करणे गरजेचे होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली. त्यांनी आम्हाला या सर्वावर आश्वासन दिले, असेही पाटील म्हणाले.
विकासपुरुषाकडून महाविकास पुरुषाकडे
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यापुर्वीच सांगितले होते की, कळव्यात विकासकामे झाली, त्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कधीच निधीची कमतरता पडू दिली नाही. त्यामुळे एका विकास पुरुषाकडून महाविकास पुरुषाकडे जातोय. या मागे आमचा उद्देश आहे की, प्रभागाचा विकास व्हावा. राजकारण हा लोककल्याणकारी राज्याकडे जाणारा मार्ग आहे आणि सत्ता हे त्याचे साधन आहे. ते साधन आम्हाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून मिळत असेल. तर, भावनेत अडकून निर्णय चुकीचे घेण्यापेक्षा आपण काहीतरी नवा निर्णय घेऊन लोकांचा विकास करण्यासाठी वेळ मिळेल. आम्हीही राजकारण किती वर्षे करणार पण, जेवढे करू तेवढ भरभरून देऊ, या अपेक्षेने हा पक्ष प्रवेश केला. वर्षभर चर्चा सुरू होती, असेही पाटील म्हणाले.