ठाणे : वरळी येथे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येऊन मेळावा घेतल्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहीले होते. या पत्रात त्यांनी मराठीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर शिवसेना (ठाकरे गट) नेते माजी खासदार राजन विचारे यांनी सरनाईक यांच्यावर टीका केली. तसेच त्यांना काय होतास तू.. काय झालास तू.. असे म्हणत एक पत्र लिहीले आहे.

राजन विचारे यांनी पत्रात काय म्हटले आहे, पहा….

प्रति,

मा. प्रताप सरनाईक

मंत्री, महाराष्ट्र राज्य

जय महाराष्ट्र !

दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाण्यासाठी मी रविवारी सकाळी घरातून बाहेर पडलो, गाडीत बसलो. प्रवास सुरु होताच एक बातमी सोशल मीडियावर आली. ती वाचत असताना माझ्या चालकाने नेहमीप्रमाणे रेडिओ लावला. तर पहिले मराठी गाणे लागले.

आणि खरच सांगतो मला तुमची आठवण आली. ते गाणे ऐकत असताना जोरजोरात हसू लागलो कारण त्या गाण्याचे बोल तंतोतंत तुम्हाला लागू होताना मला जाणवलं… गाणं १९७५ सालातील झुंज या चित्रपटातील होतं. “कोण होतास तू.. काय झालास तू… अरे वेड्या कसा वाया गेलास तू…” या गाण्यातील ओळी तुमच्याकडे पाहिल्यानंतर मला आठवल्या. खरं तर पत्र लिहीण्याचे कारणच नव्हते मात्र, आपण पत्रकबाजी करून जे अकलेचे तारे तोडले आहेत. म्हणून हे पत्र लिहावे वाटले आणि या पत्रातून मलाही मनातल्या भावना व्यक्त कराव्याशा वाटल्या आहेत.

प्रताप सरनाईक अत्यंत साध्या घरात तुमचा जन्म झाला. तुमचे लहानपण डोंबिवलीत गेलं. तुमचे “धंदे” मी देखील जवळून पाहिले आहेत. त्यानंतर तुम्ही ठाण्यात आलात. त्यानंतर तुम्ही त्या काळात काँग्रेस पक्षातून राजकारणाला सुरूवात केलीत. मग राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शिरकाव केलात. तिथेही रत्नजडीत घडयाळांची भेट देऊन वरिष्ठ नेत्यांशी सलगी करण्याचे तुमचे ‘प्रताप’ सर्वश्रुत आहेत. पुढे राष्ट्रवादीत मित्राशी ‘संघर्ष’ वाढ़ल्याने परस्पर शिवसेनेशी सवतासुभा मांडुन आमदारकीची झुल पांघरलीत.

नगरसेवक ते आमदार बनल्यानंतर तुम्ही तुमचं अख्ख कुटुंबही राजकारणात सक्रीय केलतं. ठाकरे नावामुळेच शिवसेनेत मोठे झालात. त्यानंतर, अचानक उपरती झाल्याचे गद्दार गटामध्ये जाऊन तुम्ही तुमची निष्ठा दाखवलीत. असो… दरम्यानच्या काळात स्थानिक नेत्यांचा विरोध असताना देखील हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी विश्र्वास तुमच्यावर ठेवला, तिकीट दिले आणि भरभरून प्रेमही दिले. त्यानंतर पक्षाच्या नावावर तुम्ही अफाट “माया” देखील कमावलीत. ती एवढी की सध्या ज्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसले आहात तेच तुमच्या मागे ३ महिने लागले होते. तुमच्या त्याच नेत्याच्या नगरविकास मंत्रालयाने त्यावेळी लोकायुक्तांकरवी तुमच्या चौकशीचे आदेश जारी केले होते.

एमएमआरडीएतील टॉप्स सिक्युरिटी घोटाळा ,एमएसईल जमीन घोटाळा अशा तुमच्या अनेक घोटाळ्यांमुळे ईडीचा ससेमिरा तुमच्या मागे लागला होता. त्यामुळे तुमचे काळे धंदे हे सर्वसामान्य जनतेला चांगलेच माहीत आहेत. ज्यांनी आपल्याला मोठं केले त्यांना तरी विसरू नये असे मोठी माणसे नेहमी सांगत असतात. असो, तुम्हाला विरोध असताना देखील पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी एकदा मला सांगितले. कोणत्याही परिस्थितीत प्रताप निवडून आला पाहिजे, त्यांनतर ठाण्यातील शिवसैनिकांनी जीवाचे रान करून, छातीवर दगड ठेवून तुम्हाला निवडून आणले. सरनाईकजी तुमच्या घरातील सदस्यांना फक्त एकदा विचारा नगरसेवक असताना त्यांना कोणी त्रास दिला. याचे उत्तर तुम्हाला घरातच मिळेल. कारण ती माणसे सध्या तुमच्या आजूबाजूलाच आहेत, हे मात्र लक्षात ठेवा. आणि महत्वाचे म्हणजे “भूतकालः न विस्मर्तव्यः” याप्रमाणे मागील वेळ विसरू नका.

खर तर तूम्ही आणि ढुंगणाला पाय लावून पळालेल्या तुमच्या नेतृत्वासमोर महाराष्ट्रातील एवढे प्रश्न समोर असताना तुमचे स्वार्थी राजकारण सुरू आहे. तुमच्या या घाणेरडया राजकारणाची मराठी माणसाला कीव येत आहे. एकीकडे विकासाच्या नावाने बोंबाबोंब सुरू आहे. दुसरीकडे मराठी माणसांवर चाल करून येत असताना तुम्ही उघड्या डोळ्यांनी पाहत आहात, याची लाज देखील तुम्हाला वाटत नाही याचे दुःख आहे. त्यामुळे मराठीच्या हितासाठी, मराठी माणसांसाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र आल्याने तुमची झोप उडाली आहे. हे सर्वांना माहीत आहे. एवढेच नव्हे तर दोन ठाकरे एकत्र आल्याने तुमच्या बुडाला चांगलीच आग लागली आहे. हे तमाम महाराष्ट्रातील जनतेला आता पक्कं ठाऊक झाले आहे.

मुळात उध्दवजी ठाकरे, राजसाहेब ठाकरे हे दोन बंधू मराठीसाठी एकत्र येत असताना तूम्ही एकनाथ शिंदें यांना पत्र का लिहिले, हे मराठी माणसाला कळलेलेच नाही. एक गद्दार दुसऱ्या गद्दाराला प्रश्न विचारतोय हे हास्यास्पद आहे. तुमच्यात हिम्मत असेल तर दोन्ही ठाकरें बंधूना पत्र लिहा ना. पण ती हिम्मत तुमच्यात नाही. या पत्रात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना प्रश्न विचारताना मराठी माणसांच काय भलं केलं म्हणून विचारत आहात. अहो सरनाईक तुमच्यासारख्या अनेक मराठी माणसांना ज्यांची राजकीय पार्श्वभूमी नव्हती. त्यांना शिवसेना या चार अक्षराचा परिसस्पर्श झाला आणि तुमच्या सारख्याचे आयुष्य उजळून निघाले. तरी तुम्ही विचारता ठाकरेंनी मराठी माणसांसाठी काय केलं ? तुमच्या माहितीसाठी… शिवसेनेच्या स्थानिय लोकाधिकार समितीतून हजारो मराठी माणसांना रोजगार मिळाला.

आज मुंबईत सरकारी आस्थापनात जो मराठीचा “आवाज” घुमतो आहे तो केवळ शिवसेना आणि ठाकरेंमूळेच. तुम्ही स्व:ताचा चेहरा आरशात पहा, राष्ट्रवादी काँग्रेस मधून शरद पवारांशी गद्दारी करून शिवसेनेत आला. शिवसेनेत उध्दव साहेबांशी गद्दारी करून तुम्ही शिंदे गटात गेलात. किरीट सोमय्यानी तुमच्या भ्रष्टाचाराची प्रकरण बाहेर काढल्यानंतर रात्रीच्या अंधारात तुम्ही काय ती झाडी, काय तो डोंगर पहायला गेलातच की. उद्धवजी ठाकरे आणि राजसाहेब हे स्वतःच्या कर्तुत्वाने आपली संघटना चालवत आहेत. अहो सरनाईक आपली खरी ओळख “शिवसेना” या चार अक्षरामुळे आहे आणि त्यामुळे तुम्ही एवढी माया जमवली आणि आता मराठीच्या मुद्यावर प्रश्न विचारण्याचा तुम्हाला काडीचाही अधिकार नाही. तुमचे हे जरा जास्तच होतंय.

काही दिवसांपूर्वीच हिंदी आमची लाडकी बहीण आहे सांगणारे तुम्हीच होता. हिंदी हिच मुंबईची बोलीभाषा म्हणून आपणच मुक्ताफळं उधळली. कारण मतदारसंघात तोंड दाखवायला जागा उरणार नाही म्हणून तुमचे बेगडी प्रेम दिसून आले. दुसरीकडे तुमचा मुख्य नेता जय गुजरात बोलतो, तेव्हा कुठं तुमचे मराठी प्रेम गेले? आम्हाला पण सांगा? सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी तुम्ही हापापले आहात. त्यामूळे तुम्हाला मराठी माणूस, मराठी भाषा यांच्याविषयी यत्किंचितही प्रेम नाही हे देखील सुज्ञ जनता ओळखून आहे. तुमचा जीव खोक्यात आणि तिजोरीत अडकला आहे. सत्ता येते, सत्ता जाते त्यामुळे जास्त माजू नका. तुमचे हे गलिच्छ राजकारण मराठी माणूस जाणून आहे तुम्हाला देखील चांगलेच माहीत आहे. त्यामुळे हे अत्यंत खोटारडे, स्वार्थी आणि विश्वासघातकी राजकरण तुम्ही सोडा.

भूमिपुत्रांना त्रास देऊन, आदिवासींसाठी आलेला निधी वैयक्तिक विकासासाठी वापरून गैरव्यवहार केल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांनीच केला होता ना? हे सर्व लक्षात ठेवा. आणि हो तुमच्या डोक्यावर अजूनही टांगती तलवार कायम आहे हे मात्र विसरु नका. आणि हो जाता जाता एकच सांगतो तुमचा मराठीचा, शिवसेनेचा, माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचा आणि मराठी अस्मितेचा दुरान्वये संबध नाही. तुम्ही शिवसेना हे चार शब्द, धनुष्यबाण बाजूला करा आणि राजकीय मैदानात उतरा मग “गांडूळे” चिरडल्यासारखे मराठी माणूस कसा चिरडतो हे पहा. विकाऊ गेले मात्र निष्ठावंत अजून आहेत हे लक्षात असू द्या एवढेच !

तुमचा बोलविता धनी कुणी असेल तर त्यालाही हा इशारा समजा. तूर्तास एवढेच… फक्त यापूढे ठाकरे ब्रँड बद्दल बोलताना, थोडी काळजी घ्या !

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम् –  राजन विचारे (शिवसेना नेते, माजी खासदार ठाणे लोकसभा)