सर्वोच्च न्यायालयाने महाविकास आघाडी सरकारला ओबीसी आरक्षणावरून मोठा धक्का दिला आहे. राज्य सरकारने या संदर्भात केलेला कायदा फेटाळून लावत १५ दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून राज्य निवडणूक आयोगाला देण्यात आला आहे. त्यामुळे आता महापालिका निवडणुका लवकरच जाहीर होणार आहे. असं असताना निवडणुकीपूर्वीच शिवसेना पक्षातील वाद चव्हाट्यावर येत आहेत. ठाण्यात शिंदे-फाटक गटातील वाद चर्चेचा विषय ठरला आहे. ठाण्यातील शिवसेनेचे माजी नगरसेवक विकास रेपाळे, नम्रता भोसले आणि नम्रता फाटक आणि राजू फाटक हे एकमेकांना भिडल्याचा प्रकार समोर आला. एकमेकांना शिवीगाळ करत त्यांच्यात झटापट झाल्याची चित्रफीत सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
विकास रेपाळे हे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जातात. तर, राजू फाटक हे आमदार रवी फाटक यांचे बंधू आहेत. यामुळे शिंदे आणि फाटक गटातील वाद चव्हाट्यावर आले आहेत. रहेजा येथील मेट्रोच्या उड्डाण पुलाखाली शहर सौंदर्यीकरनाचे काम सुरू असून या कामावरूनच हा वाद झाला आहे. दोन दिवसांपूर्वी हा वाद झाला आहे. वाद एवढा विकोपाला गेला की त्यांनी एकमेकांना शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांच्यात झटपटही झाली. या वादाची चित्रफीत प्रसारित झाल्याने खळबळ उडाली आहे. माजी नगरसेवक विकास रेपाळे, नम्रता भोसले आणि नम्रता फाटक यांच्या गेल्या काही वर्षांपासून अंतर्गत वाद सुरू आहेत.
राज्यात जवळपास १४ महापालिका आणि २५ जिल्हापरिषदांसह अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. या निवडणुका २०२० च्या जुन्याच प्रभागरचनेनुसार घेतल्या जाव्यात असे न्यायालयाने आदेश दिले आहेत. एवढच नाही तर निवडणुका सतत पुढे ढकलण्यात आल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाच्या कारभारावर देखील तीव्र नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. ठाणे महापालिकेत शिवसेनेला पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली २०१७ च्या निवडणुकीत बहुमत मिळाले. १९८६ ते २०१७ या काळात ठाणे महापालिकेच्या सात निवडणुका झाल्या. ३१ वर्षांत २४ वर्षे पालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. आजवर कोणत्याही एका राजकीय पक्षाला एकदाही निर्विवाद बहुमत मिळाले नव्हते. मात्र २०१७ च्या निवडणुकीत शिवसेनेला एकहाती सत्ता मिळाली.