ठाणे : आपल्या पाऊणे तीन वर्षाच्या कालावधीत जिल्हा प्रशासनाच्या कामावर, प्रकल्पांवर एकदाही उघडपणे भाष्य न केलेले आणि कायम ‘नॉट रिचेबल’ जिल्हाधिकारी म्हणून ठाण्याचे माजी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांची ख्याती होती. मात्र, आपल्या निवृत्तीच्या वेळी अचानक उपरती आल्याने त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातीलच रस्त्यांच्या दुरवस्थे बाबत जिल्हाधिकारी महोदयांना प्रश्न विचारला असता याबाबत तातडीने कार्यवाही करण्याबाबत सूचना केल्या. मात्र, गेल्या पाऊणे तीन वर्षांपासून त्याच आवारातून जाताना जिल्हाधिकाऱ्यांना ही दुर्दशा दिसली नाही का असा सवाल आता उपस्थित होत आहे.

राज्यातील सत्ताबदलानंतर विविध जिल्ह्यातील प्रशासकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरु झाले. यामध्ये ठाणे जिल्हाधिकारी पदी असलेल्या राजेश नार्वेकर यांच्या जागी ठाणे जिल्हाधिकारी म्हणून अशोक शिनगारे यांची वर्णी लागली होती. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे खासदार पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून शिनगारे यांची ठाणे जिल्हाधिकारी पदी म्हणून वर्णी लागल्याचे बोलले जात होते. तर, राजेश नार्वेकर हे ठाकरे गटाचे संजय राऊत यांचे व्याही असल्याने यांची बदली झाली असल्याच्या ही चर्चा त्यावेळी रंगल्या होत्या. यामुळे ठाणे जिल्हाधिकारी पद चांगलेच चर्चेत आले होते.

ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे हे नियत वयोमानानुसार गुरुवार, ३१ जुलै रोजी सेवानिवृत होत आहेत. यानिमित्ताने ठाणे जिल्ह्यातील सर्व प्रसारमाध्यम प्रतिनिधींसोबत जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात अनौपचारिक संवाद साधला.

यावेळी ठाण्याचे जिल्हाधिकारी म्हणून यशस्वी कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर प्रशासकीय सेवेतून निवृत्त होताना, अशोक शिनगारे यांनी मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली. ‘प्रशासकीय अधिकारी म्हणून निवृत्त होताना काही काळ मी विमनस्क अवस्थेत होतो.’ एकांतात विचार करताना मनात प्रश्न आला, आपण खरंच न्याय दिला का? आणि त्याच क्षणी उत्तर मिळाले ‘प्रयत्न केले, पण ते पुरेसे नव्हते,’ असे भावूक शब्द शिनगारे यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

तसेच गेले पावणे तीन वर्षात वेळेअभावी मला पत्रकारांशी संवाद साधता येऊ शकला नाही, याबाबत खंत देखील त्यांनी व्यक्त केली होती. यादरम्यान, काही पत्रकारांनी आपले वैयक्तिक अनुभव मांडले. तर, एका पत्रकाराने ठाणे जिल्हाधिकारी आवारातील शिधा वाटप कार्यालयाजवळील रस्त्याची दुर्दशा झाली असून याठिकाणी अनेक दुचाकीस्वार पडत असल्याची समस्य़ा मांडली. तो रस्ता बनवणे खूप गरजेचे आहे, असे त्या पत्रकाराने सांगितले. या तक्रारीला गांभीर्याने घेत शिनगारे यांनी तत्काळ संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावले आणि दोन ते तीन दिवसांच्या आत काम पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. परंतू, गेल्या पाऊणे तीन वर्षांपासून त्याच आवारातून जाताना जिल्हाधिकाऱ्यांना ही दुर्दशा दिसली नाही का ? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.