लोकल ट्रेनमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थिनीला मारहाण
चर्चगेट लोकलमध्ये ऋ तुजा नाईक या विद्यार्थिनीला झालेल्या मारहाणप्रकरणी वसई रेल्वे पोलिसांनी गुरुवारी चार महिलांना विरार रेल्वे स्थानकातून सापळा लावून ताब्यात घेतले. त्यांना न्यायालयात हजर करून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. या मारहाणीबद्दल सर्व स्तरांतून संताप व्यक्त होत आहे.
ऋ तुजा नाईक (२०) ही तरुणी विरारच्या बोळींज येथे राहते. वसईच्या विद्यावर्धिनी महाविद्यालयात ती अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षांत शिकते. सकाळी नऊ वाजता महाविद्यालय सुरू होत असल्याने ती पावणेनऊच्या आसपास विरारहून ट्रेन पकडून वसईला येते. मंगळवारी सकाळी तिने विरार स्थानकातून ८ वाजून ४० मिनिटांनी सुटणारी चर्चगेट लोकल पकडली. त्या वेळी महिलांच्या डब्यातील काही महिलांनी तिला विरोध केला. तुला वसईला उतरायचे, मग तू चर्चगेट लोकल का पकडली? अंधेरी-बोरिवली लोकल का पकडली नाही, असा सवाल त्यांनी केला. यानंतर सात महिलांनी तिला बेदम मारहाण करायला सुरुवात केली. वसई स्थानक येईपर्यंत म्हणजे दहा मिनिटे या महिला ऋतुजाला मारहाण करत होत्या. कशीबशी ती वसई स्थानकात उतरली आणि तिने वसई स्थानकात रेल्वे पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी अज्ञात महिलांविरोधात मारहाणीचा अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. गुरुवारी सकाळी साध्या वेशातील पोलिसांनी विरार रेल्वे स्थानकात सापळा लावला. ८ वाजून ४० मिनिटांनी सुटणाऱ्या त्याच चर्चगेट लोकलमध्ये मारहाण करणाऱ्या महिला येताच ऋतुजाने पोलिसांना इशारा केला. महिला पोलिसांच्या मदतीने मारहाण करणाऱ्या महिलांना ताब्यात घेण्यात आले. नयना ठाकूर (५०) दीपाली सावंत (४५), नेहा ठाकूर (२१) आणि अश्विनी गुरव (२४) अशी मारहाण करणाऱ्या महिला प्रवाशांची नावे आहेत. त्या खासगी आणि सरकारी कंपन्यांमध्ये काम करतात.
..तर ऋतुजाचा प्रवेश मुकला असता
या भयानक अनुभवाबद्दल बोलताना ऋतुजाने सांगितले की, मी दररोज प्रथम श्रेणीच्या डब्यातून प्रवास करते, पण पास संपल्याने मी मंगळवारी द्वितीय श्रेणीच्या डब्यातून जात होते. माझ्या शेवटच्या वर्षांत प्रवेश घेण्याचा शेवटचा दिवस होता. माझ्या बॅगेत पुस्तके, अर्ज तसेच एक लाख रुपयांचा डिमांड ड्राफ्ट होता. मला दम्याचा त्रास असल्याने या महिला मारहाण करत असताना माझा जीव गुदमरला होता. त्या मला वसईला खाली उतरू देत नव्हत्या. मी जर वसईला उतरू शकले नसते तर मी प्रवेशाला मुकले असते.
मी हा प्रसंग कधीच विसरणार नाही. एवढय़ा अर्वाच्य आणि अश्लील शिव्या मी आयुष्यात कधी ऐकल्या नव्हत्या. सहा ते सात महिला मला मारहाण करत होत्या. दम्याच्या त्रासामुळे माझा श्वास कोंडला गेला होता. अर्थात मी घाबरणार नसून या गुंडगिरीविरोधात लढत राहणार आहे.
– ऋतुजा नाईक
या सर्व महिला नालासोपाऱ्यात राहतात, परंतु चर्चगेट लोकलमध्ये जागा अडविण्यासाठी त्या नालासोपाऱ्याहून विरारला जातात. इतर महिला प्रवाशांना त्या डब्यात शिरू देत नसत. त्यांनी मारहाण केल्याची कबुली दिली आहे. त्यांना न्यायालयात हजर करून कलम १०७ प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. सहा महिने चांगल्या वर्तणुकीचे हमीपत्र लिहून घेण्यात आले आहे.
– महेश बागवे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वसई रोड स्थानक
रेल्वे सुरक्षा बलाचे दुर्लक्ष
सुरवातीला ऋतुजा रेल्वे सुरक्षा बलाकडे तक्रार घेऊन गेली होती. त्यांनी रेल्वे पोलिसांकडे पाठविण्याऐवजी उदय़ा आम्ही येऊन पाहूू, असे आश्वासन देऊन परत पाठवले होते. नंतर तिने नातेवाईकांच्या मदतीने वसई रेल्वे पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार नोंदवली गेली.
गर्भवती महिलेलाही मारहाण
गेल्या महिन्यात बबिता मौर्या या महिलेला मारहाण करण्यात आली होती. बबिता गर्भवती असल्याने अपंगांच्या डब्यात चढल्या होत्या. नालासोपारा येथे त्यांनाही मारहाण झाली होती. या प्रकरणी सुशीला चव्हाण या महिलेला ताब्यात घेतले होते.