उत्तरक्रिया आटोपून परतताना भिवंडीजवळ काळाचा घाला
एका नातेवाईकाचे उत्तरक्रिया विधी आटोपून परतत असताना मुंबई-नाशिक महामार्गावर भिवंडी तालुक्यातील माणकोली गावाजवळ मंगळवारी रात्री झालेल्या अपघातात भांडुप येथील केदारे कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला.
भरधाव गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटून ती गाडी दुभाजकाला धडकून विरुध्द दिशेने येणाऱ्या टेम्पोला धडकली होती. या अपघातात भांडुप येथील तुलशेतपाडा येथे राहाणारे वसंत अर्जुन केदारे (वय ६३), त्यांची मुले अमित (३५), सचिन (३१) आणि सून सुमिता अमित केदारे (३०) यांचा मृत्यू झाला.
केदारे कुटुंबीय संगमनेरजवळील घारगांव या मुळगावी एका आप्ताच्या उत्तरक्रियेसाठी गेले होते. तेथून परतताना अमित गाडी चालवत होता. अपघात एवढा भीषण होता की गाडीतील सर्वचजण दबले गेले होते. गस्तीवर असलेल्या नारपोली वाहतूक शाखेचे पोलीस शिपाई नामदेव हिमगिरे यांनी दुर्घटनास्थळी धाव घेतली. तासाभराच्या अथक परिश्रमानंतर जखमींना बाहेर काढले.
ठाण्याच्या शासकीय रुग्णालयात नेत असताना तिघांचा मृत्यू झाला तर सचिन यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात टेम्पो चालक विमलेश नन्हेलाल पाल (४०, रा. भिवंडी) हा बेशुध्द पडला होता. अर्थात टेम्पोचालक योग्य दिशेनेच गाडी चालवत असतानाही पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
