कल्याण – कल्याण पश्चिमेतील गांधारे भागात रविवारी एक उदवहन सातव्या माळ्यापासून जमिनीवर कोसळल्याने उदवहनातील चार तरूण गणेशभक्त जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या उदवहनातून एकूण आठ जण प्रवास करत होते.

गणेशोत्सव सुरू आहे. गणेश भक्त आपले नातेवाईक, मित्र यांच्या घरी गणपती दर्शनासाठी जात आहेत. रविवारी दुपारी कल्याण पश्चिमेतील गांधारे भागातील राॅयल गॅलेक्सी सोसायटीतील आपल्या मित्राच्या घरी चार मित्र चालले होते. ते इमारतीच्या तळमजल्यावर आल्यावर त्यांनी उदवाहनातून जाण्याचा निर्णय घेतला.

उदवाहनात चार मित्र आणि सोसायटीतील इतर चार जण असे एकूण आठ जण प्रवास करत होते. उदवहन बंद झाल्यानंतर ते सुस्थितीतपणे सहा आणि सातव्या माळ्यापर्यंत गेले. आठव्या माळ्याच्या दिशेने जात असताना अचानक उदवहन खाली सरकल्याचे उदवहनमधील प्रवाशांना जाणवले. काही तरी घडतय असे वाटत असतानाच उदवहन वेगाने जमिनीवरील उदवहनाच्या खड्ड्यात कोसळले.

पन्नास ते साठ फूट उंचीवरून उदवहन जमिनीवर कोसळल्याने उदवहनमधील प्रवासी जोराने एकमेकांंवर आपटले. यामध्ये अनक प्रवाशांच्या हात, पाय, डोक्याला दुखापती झाल्या. सोसायटीत जमिनीवर मोठा आवाज झाला म्हणून रहिवासी बाहेर आले. तेव्हा त्यांना उदवहन जमिनीवर कोसळल्याचे निदर्शनास आले. तात्काळ रहिवाशांनी उदवहनमध्ये अडकलेल्या आठ जणांना बाहेर काढले. त्यांना तात्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले.

इतर चार जणांची प्रकृती सुस्थितीत होती. या उदवहनची नियमितपणे देखभाल दुरुस्ती होत नसल्यामुळे ही दुर्घटना घडली असल्याचा आरोप रहिवाशांनी केला. जखमी झालेले चार जण युवा गटातील आहेत. गणपती दर्शनासाठी जात असताना अपघात झाल्याने या तरूणांचा भ्रमनिरास झाला.